आरमोरी,
गडचिरोली हा शेतीसाठी सुजलाम सुफलाम जिल्हा म्हणून ओळखला जात असताना या जिल्ह्यात शेतकर्यांना पाहिजे त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होत नाही. या जिल्ह्यात शेतकर्यांना शेतीवर अवलंबून राहावे लागत असल्याने पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नसल्यामुळे काही पीक हातातून निघून जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात सिंचनाची बारमाही सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी माजी आमदार Ramakrishna Madavi रामकृष्ण मडावी यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
येथील आदिवासी आश्रम शाळेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुलतुली आणि कारवाफा हे प्रकल्प 1978 पासून मंजूर असताना सुद्धा याकडे कोणत्याही राज्यकर्त्याचे लक्ष नाही. मात्र या जिल्ह्याचा कच्चा माल वाहून नेण्याकरता अंदाजे 300 कंपन्या या जिल्ह्यात येऊ पाहत आहेत. या कंपन्यांना हजारो हेक्टर जागा लागणार आहे. ज्यावेळी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद फोफावला होता, अशा कालखंडात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी गडचिरोली जिल्ह्यात येण्याकरिता धजावत नव्हते. मात्र आता बाहेरील कंपन्या गडचिरोली जिल्ह्यात येत असल्याने मोठ-मोठे अधिकारी स्वतःहून गडचिरोली जिल्ह्यामध्ये येण्यास इच्छुक आहेत याचा अर्थ काय? असा प्रश्न रामकृष्ण मडावी यांनी उपस्थित केला.
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्यांना धरणे तयार करून द्यावे. त्या माध्यमातून शेतकर्यांचे उत्पन्न वाढेल आणि जिल्ह्याची प्रगती होईल. गडचिरोली जिल्ह्यातील इतर प्रकल्प प्रस्तावित आहेत, ते सुरू करावेत. शेतकर्यांच्या जागा सिंचनासाठी वापराव्या, विमानतळ स्थापन करावे, धरणांचे बांधकाम करावे, अशी मागणी माजी आमदार Ramakrishna Madavi रामकृष्ण मडावी यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.