सुषमा अंधारे यांचा रुपाली चाकणकरांवर गंभीरआरोप

20 Mar 2026 12:05:06
नाशिक
Sushma Andhare नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गाजत असून, या प्रकरणात आता नवे आणि गंभीर आरोप समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर थेट आरोपांची सरबत्ती केली.
 

Sushma Andhare  
पत्रकार परिषदेत बोलताना अंधारे म्हणाल्या की, या प्रकरणात चाकणकर यांचे नाव सातत्याने समोर येत असून, त्यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नाही. “माझा फक्त ट्रस्टपुरता संबंध होता आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी काहीही देणेघेणे नाही,” असे चाकणकर सांगत असल्या तरी, प्रत्यक्षात त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचे पुरावे समोर आल्याचा दावा अंधारे यांनी केला.
 
 
अंधारे यांनी पुढे सांगितले की, Sushma Andhare चाकणकर या अशोक खरात यांना पाठीशी घालत होत्या. “ज्योतिष सांगणे वेगळी गोष्ट असली तरी तंत्र-मंत्र आणि काळी जादू या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कृती आहेत,” असे त्या म्हणाल्या. स्वतःला सुधारणावादी म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारच्या कृतींमध्ये सहभागी होणे अत्यंत गंभीर असल्याची टीकाही त्यांनी केली.या प्रकरणात काही पीडित महिलांशी संवाद साधल्याचा दावा करत अंधारे यांनी सांगितले की, चाकणकर आणि खरात यांचे केवळ औपचारिक नव्हे, तर कौटुंबिक संबंधही असल्याची माहिती समोर आली आहे. खरात कुटुंबातील विविध प्रसंगांमध्ये चाकणकर उपस्थित होत्या, तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रेही लवकरच समोर आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, एका पीडित महिलेने चाकणकर स्वतः तंत्र-मंत्र साधना करत असल्याचा गंभीर आरोप केल्याचेही त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदेत अंधारे यांनी चाकणकर आणि अशोक खरात यांचे काही छायाचित्रेही दाखवली. “हे फोटो केवळ ट्रस्टमधील संबंध दर्शवतात का, की त्यापलीकडील नाते स्पष्ट करतात, हे चाकणकर यांनीच सांगावे,” असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, अंधारे यांनी तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवणे, चाकणकर आणि अशोक खरात यांची समोरासमोर चौकशी करणे आणि दोघांची नार्को टेस्ट करण्याचा समावेश आहे. तसेच, दोघांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासून त्यांच्या संवादाचे तपशील उघड करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.या नव्या आरोपांमुळे भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आणखीच गंभीर बनले असून, राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0