kerosene गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरच्या टंचाईने ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. २०१८ पासून पूर्णतः बंद असलेला केरोसीन पुरवठा आता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने गावागावात दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अंत्योदय व प्राधान्य गटातील कार्डधारकांना रेशन दुकानांमार्फत केरोसीन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे.
१७ मार्च रोजी पुरवठा विभागामार्फत जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर केरोसीनची मागणी नोंदविण्यात आली. तिवसा शहर नगरपंचायत क्षेत्रात येत असल्याने शहरातील सहा रेशन दुकाने या योजनेतून वगळण्यात आली असून, केवळ ग्रामीण भागातील ग्रामपंचायत हद्दीतील लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तिवसा तालुक्यात ३८९६ अंत्योदय कार्डधारक तर १४७६६ प्राधान्य गटातील लाभार्थी आहेत. अशा एकूण १८६६२ लाभार्थ्यांसाठी केरोसीनची मागणी करण्यात आली आहे. प्रति लाभार्थी सुमारे दीड लिटरप्रमाणे विचार करता तब्बल २७९९३ लिटर केरोसीनची मागणी जिल्हास्तरावर पाठविण्यात आली आहे.
तहसील रेशन पुरवठा विभागाने आधीच तालुक्यातील सर्व पुरवठा वितरकांना पूर्वसूचना दिली असून, वितरण यंत्रणेचा सविस्तर आढावाही घेण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष केरोसीन वाटप सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.kerosene आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा थेट परिणाम गॅस पुरवठ्यावर झाला आहे. त्यातच कंपन्यांनी लागू केलेली ४५ दिवसांची बुकिंग मर्यादा आणि ऑनलाईन बुकिंगमधील तांत्रिक अडचणी यामुळे ग्रामीण भागात सिलेंडर मिळवणे कठीण झाले आहे.