गडचिरोली,
जंगलसंपन्न जिल्हा म्हणून देशभर ओळख असलेल्या गडचिरोलीतच Bamboo shortage बांबूचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या 15 दिवसांपासून कच्चा मालच उपलब्ध नसल्याने शेकडो आदिवासी कारागीर अक्षरशः हातावर हात धरून बसले असून त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. पिढ्यानपिढ्या बांबूपासून विविध कलात्मक वस्तू तयार करणारे येथील आदिवासी आज हतबल झाले आहेत. त्यांच्या उत्पादनांना देश-विदेशात मागणी असतानाही केवळ बांबूअभावी संपूर्ण उद्योग ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. काम आहे, बाजारपेठ आहे; पण कच्चा मालच नाही, अशा शब्दांत कारागिरांनी आपली व्यथा मांडली.
Bamboo shortage यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे स्थानिकांना बांबू मिळत नसताना बाहेरील जिल्ह्यांतील ठेकेदार मात्र मोठ्या प्रमाणात साठा उचलत असल्याचा आरोप समोर येत आहे. ठेकेदारांची मनमानी सुरू असताना प्रशासन मात्र मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे. वारंवार मागणी करूनही अधिकार्यांकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने संताप उफाळून आला आहे. आमच्या पोटाचा प्रश्न आहे; पण प्रशासनाला काहीच देणंघेणं नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया एका कारागिराने व्यक्त केली. बांबू उद्योगावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून स्थलांतराची वेळ जवळ येत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून स्थानिकांना प्राधान्याने बांबू उपलब्ध करून देणे, ठेकेदारांवर नियंत्रण आणणे आणि या पारंपरिक उद्योगाचे संरक्षण करणे अत्यावश्यक ठरत आहे. अन्यथा, गडचिरोलीची ओळख असलेला हा कलात्मक वारसा कायमचा नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.