म्हैसूर,
BJP leader's son dies कर्नाटकातील म्हैसूर आणि हुबळी परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. समाजमाध्यमांसाठी चित्रफीत तयार करत असताना झालेल्या अपघातात १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. नमिष संगलद असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो स्थानिक भाजपा नेते वीरेश संगलद यांचा मुलगा होता. मिळालेल्या माहितीनुसार, नमिष उगादी सणानिमित्त कुटुंबासोबत हुबळी येथे आला होता. या दरम्यान तो आपल्या मित्रांसोबत बाहेर गेला असता, काही जण चित्रफीत तयार करत होते. नमिष दुचाकी चालवत होता, तर त्याच्याच वयाचा दुसरा मुलगा कार चालवत होता. अचानक दोन्ही वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची जोरदार धडक झाली. या धडकेत नमिष काही अंतर हवेत फेकला गेला आणि त्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात धोकादायक प्रकारचे चित्रीकरण करताना घडला. संबंधित मुलांनी वाहनांवर नियंत्रण गमावल्याने ही दुर्घटना झाली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.