भद्रावतीची रेवा कौरासे मराठी बिग बॉसमध्ये

21 Mar 2026 19:25:30
अनेक सीरियलमध्ये केले काम
चंद्रपुरात पूर्ण केले अभियांत्रिकीचे शिक्षण

माजरी, 
भद्रावती येथील Reva Kurase रेवा विठ्ठल कौरासे या सामान्य कुटुंबातील युवतीने तिच्या गुणवत्तेच्या जोरावर स्थानिक कक्षा रुंदावून थेट मुंबईच्या माया नगरीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. सध्या ती एका टीव्ही चॅनेलवर सुरू असलेल्या ‘बिग बॉस’ या मराठी रिलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर आनंद व्यक्त होत आहे. रेवा ही वेकोलिच्या चारगाव कॉलनीतील रहिवासी आहे. तिचे वडील माजरी येथे वेकोलित कार्यरत आहे. तर आई गृहिणी आहे. रेवा ही चार बहिणीतील सगळ्यात लहान बहीण आहे. रेवाचे दहावीपर्यंतचे शिक्षण स्थानिक जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर शिंदे कनिष्ठ महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण करून चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून 2019 मध्ये पदवी पूर्ण केली.
 
 
Reva Kurase
 
अभियांत्रिकीला असताना तिने सुरत येथे झालेल्या ‘ऑरा फेस ऑफ इंडिया’ स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेमुळे तिचा आत्मविश्वास वाढला. तिने आत्मविश्वासाच्या जोरावर मॉडेलिंग, अक्टिंग या क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. त्यानंतर Reva Kurase  रेवाने मुंबई येथे मॉडेलिंगचे प्रोजेक्ट्स केलेत. सोबतच विविध ब्रँड्ससाठी जाहिराती शूट केल्या. ‘प्यार का पहला अध्याय’, शिवशक्ती’, ‘रिमझिम’ आणि ‘दिवाणीयत’ या सीरियलमध्ये तिने भूमिका साकारल्या. हे सर्व सुरू असतानाच तिला मराठी बिग बॉसची ऑफर आली आणि तिने ती ऑफर स्वीकारली. दोन हजार सहभागी सोबत तिचीही ऑडिशन्स प्रक्रिया पार पडली. त्या सर्वांत तिची निवड झाली. वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून ती बिग बॉसमध्ये सहभागी झाली. आता ती या बिग बॉस रिलिटी शोच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली आहे. रेवाच्या जन्माअगोदर घरची परिस्थिती जेमतेम होती. तिच्या जन्मानंतर वडिलांना वेकोलित नोकरी लागली. त्यामुळे घरी तिला सर्व लकी मानतात. आई वडील व बहिणींचा सतत पाठिंबा तिला होता. त्यामुळे तिने तिचे करिअर मुंबईच्या चित्रपट सृष्टीत घडविण्याचे ठरविले. या अगोदर रेवाने हिंदी चॅनल्सवर काम केले. आता मराठी बिग बॉस हा एक लोकप्रिय रिलिटी शो असल्याने घरोघरी तिला बघितल्या जात आहे. त्यात आपल्या गावची मुलगी दिसत असल्याने आनंद व्यक्त केल्या जात आहे. नुकताच महिलादिनाचे औचित्य साधून रेवाचा नगरपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. तो सत्कार तिच्या आई वडिलांनी स्वीकारला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0