राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 'वर्ष प्रतिपदा उत्सव'
गोंदिया,
ज्या संतांनी संपूर्ण समाजाला दिशा दिली, त्यांना आज आपण केवळ एका विशिष्ट जातीच्या चौकटीत अडकवून ठेवले आहे. संतांचे विचार हे वैश्विक होते, मात्र आज प्रत्येक जातीच्या संघटनेने आपापल्या जातीचा संत वाटून घेतला आहे. जोपर्यंत आपण ही जातीपातीची भिंत पाडून सामाजिक समरसता आणत नाही, तोपर्यंत समाजात अपेक्षित परिवर्तन येणार नाही, असे प्रतिपादन भारतीय विचार मंचचे भंडारा विभाग संयोजक प्रा. संजय देशपांडे यांनी केले. ते 19 मार्च रोजी गुरुनानक शाळेच्या प्रांगणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोंदिया नगरतर्फे आयोजित वर्ष प्रतिपदा उत्सवात प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा संघचालक लीलाराम बोपचे, नगर संघचालक मिलिंद अलोणी, नगर सहसंघचालक डॉ. मुकेश येरपुडे उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. देशपांडे यांनी डॉ. हेडगेवार यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून ती आपल्यालाही पुढे न्यायची आहे. डॉक्टरांनी कोलकाता येथे वैद्यकीय शिक्षण घेताना केवळ पदवी मिळवली नाही, तर क्रांतिकारकांच्या सशस्त्र चळवळीतही सहभाग घेतला. १९२० च्या अधिवेशनानंतर देशाची परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी १९२५ मध्ये शून्यातून संघ उभा केला. आज संघ ज्या वटवृक्षाच्या रूपात उभा आहे, त्यामागे अनेक प्रचारक आणि निष्ठावान स्वयंसेवकांचे मोठे समर्पण आहे. १९७५ च्या आणीबाणीच्या काळात स्वयंसेवकांनी सोसलेल्या हालअपेष्टांमुळेच आज संघ या शिखरावर पोहोचला आहे, असेही त्यांनी नमूद केले. संघाचा पाया डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांच्या विचारांवर उभा असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विपरीत परिस्थितीतही ध्येयाशी निष्ठा ठेवणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख करताना त्यांनी स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील उदाहरणे दिली. संघाच्या कार्यातून अनेक सामाजिक संस्था उभ्या राहिल्या असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विश्व हिंदू परिषद यांसारख्या संघटनांचा उल्लेख त्यांनी केला. निष्ठावान आणि समर्पित स्वयसेवकांमुळे संघकार्याचा विस्तार झाला असून समाजपरिवर्तनाची प्रक्रिया अधिक गतिमान झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
देशाच्या बदलत्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी राम जन्मभूमी आंदोलन आणि कलम ३७० हटवणे यांसारख्या ऐतिहासिक घटनांमुळे भारताच्या राजकारणाची दिशा बदलली असून लवकरच समान नागरी कायदा येईल, असा विश्वास व्यक्त केला. देशपांडे यांनी “पंच परिवर्तन” या संकल्पनेवर विशेष भर देत सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, नागरी कर्तव्य आणि स्वदेशी या विषयांवर काम करण्याचे आवाहन केले. प्लास्टिकमुक्ती, पाणी बचत यांसारख्या उपक्रमांतून समाजात जागृती निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येकाने छोटा का होईना, पण एक चांगला संकल्प करून त्याची अंमलबजावणी करावी, असे सांगत “एक दुर्गुण दूर करून एक सद्गुण अंगीकारल्यास समाज आणि राष्ट्र दोन्ही बदलू शकतात,” असा सकारात्मक संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने स्वयंसेवक, नागरिकांची उपस्थिती होती.