नवी दिल्ली,
Trinamool's entry in Assam elections आसाममध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणूक आयोगाने ९ एप्रिल २०२६ रोजी मतदान घेण्याची घोषणा केल्यानंतर विविध पक्षांनी आपापल्या हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्षानेही मैदानात उतरून आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत १७ जणांना संधी देण्यात आली असून त्यामुळे आसामच्या राजकारणात नवी रंगत निर्माण झाली आहे.
आसाम विधानसभेच्या एकूण १२६ जागांसाठी ही निवडणूक होणार असून मतदानाची प्रक्रिया ९ एप्रिल रोजी पार पडेल. त्यानंतर ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २० मे २०२६ रोजी संपणार आहे. मागील २०२१ मधील निवडणुकांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी ला स्पष्ट बहुमत मिळाले होते आणि हिमंता बिस्वा सरमा यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती.
यावेळी मात्र सत्ताधारी पक्षांसोबतच विरोधकांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. तृणमूल काँग्रेसने उमेदवार जाहीर करताच लढतीत अधिक चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या जाहीरनाम्यातून मतदारांना थेट साद घालत भाजपवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी लोकांना भीतीला बळी न पडण्याचे आवाहन करत, कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नये असे सांगितले. तसेच सीमावर्ती भागात गोंधळ निर्माण करण्यासाठी पैशांचा आणि शस्त्रांचा वापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.