खरात प्रकरणात नवा वाद: चाकणकर-पत्रकार वाद चिघळला

22 Mar 2026 14:45:11
अहिल्यानगर,
ashok-kharat-case : अहिल्यानगरमध्ये अशोक खरात प्रकरणामुळे पुन्हा एकदा राजकीय आणि माध्यम क्षेत्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरातवर गंभीर आरोप असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणामुळे विविध खुलासे समोर येत असून प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहे.
 
 

kharat case 
 
 
या प्रकरणाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
 
दरम्यान, ‘खबरदार पुढारी’ या वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रय खेमनर यांनी एक गंभीर आरोप करत सांगितले की, त्यांनी वर्षभरापूर्वीच या प्रकरणावर बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर त्यांना धमक्या मिळत असल्याचा दावा त्यांनी केला असून आपल्या जीवाला धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणीही केली आहे.
 
खेमनर यांनी असेही सांगितले की, रुपाली चाकणकर यांनी त्यांच्याविरुद्ध आणि त्यांच्या वृत्तपत्राविरुद्ध पोलिसांना पत्र दिले होते. त्यांच्या मते, त्या पत्रात वृत्तपत्र बंद करण्याची मागणीही करण्यात आली होती. तसेच, चाकणकरांनी आपले आरोप खोटे असल्याचे म्हटले असले तरी ते सत्य असल्याचा दावा खेमनर यांनी केला आहे. चाकणकरांनी फोन केला नाही असे म्हटले असले तरी त्यांचा कॉल डेटा रेकॉर्ड (CDR) तपासावा, असेही ते म्हणाले.
 
दुसरीकडे, रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित एक बातमी ‘खबरदार पुढारी’मध्ये प्रसिद्ध झाली होती. या बातमीची महिला आयोगाने दखल घेतली होती. मात्र, संपादकांनी दिलेल्या उत्तरात ती बातमी केवळ ऐकीव माहितीवर आधारित असल्याचे आणि त्यांच्याकडे कोणताही ठोस पुरावा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
चाकणकरांच्या पत्रात असेही नमूद आहे की, कोणताही पुरावा नसताना बातमी प्रकाशित केल्यामुळे महिलांची बदनामी झाली असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी आणि वृत्तपत्राने खोटी बातमी प्रसिद्ध केल्याचे मान्य करून खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
या संपूर्ण प्रकरणामुळे पत्रकार आणि राजकीय व्यक्ती यांच्यातील वाद अधिकच वाढला असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0