तेहरान,
Iran US War : जागतिक पातळीवर तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने एक नवा आर्थिक डाव खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांतील सूत्रांच्या माहितीनुसार, इराण होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेल टँकरकडून मोठा शुल्क आकारण्याचा विचार करत आहे. CNN च्या अहवालानुसार, या मार्गावर नियंत्रण असल्याचा फायदा घेत इराण आता जहाजांच्या हालचालींवर अटी घालण्याच्या तयारीत आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या प्रत्येक टँकरकडून सुमारे २ मिलियन डॉलर इतका शुल्क आकारला जाऊ शकतो. इराण या माध्यमातून दबाव निर्माण करत नवीन नियम लागू करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगितले जात आहे. या घडामोडींचा थेट परिणाम जागतिक तेल पुरवठा आणि दरांवर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या तणावामुळे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही दबाव वाढत असल्याची चर्चा आहे. काही सूत्रांच्या मते, इराणने मांडलेल्या अटी स्वीकारल्या नाहीत, तर त्याचा परिणाम त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरही होऊ शकतो.
याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, जर इराणने ४८ तासांत होर्मुज सामुद्रधुनी पूर्णपणे खुली केली नाही, तर अमेरिकेकडून त्यांच्या ऊर्जा प्रकल्पांवर मोठी कारवाई केली जाईल. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इराणला हा अल्टिमेटम दिला असून, गरज पडल्यास प्रमुख ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करण्याचा इशाराही दिला आहे.
एकूणच, होर्मुज सामुद्रधुनीभोवती वाढत असलेल्या या तणावामुळे जागतिक स्तरावर चिंता वाढली असून, पुढील काही दिवसांत परिस्थिती कशी बदलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.