हळदीच्या नावाखाली नशा विक्री; पुण्यात ड्रग रॅकेटचा भंडाफोड

22 Mar 2026 15:42:08
पुणे,
drug-racket-busted : पुण्यातील बाणेर परिसरात पोलिसांनी एक धक्कादायक ड्रग रॅकेट उघडकीस आणले आहे. या रॅकेटमध्ये हळदीच्या पाकिटांचा वापर करून गांज्याची विक्री केली जात होती. गुप्त माहितीनुसार पोलिसांनी कारवाई करत हा प्रकार उघड केला आणि दोन जणांना अटक केली.
 
 
drug-racket-busted
 
 
या प्रकरणात अभिषेक बोरसे आणि अक्षय बोरसे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघेही एका खासगी कंपनीत काम करत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी सुरुवातीला बाणेरमधील ठिकाणी छापा टाकला असता, हळद म्हणून लेबल लावलेल्या पाकिटांमध्ये प्रत्यक्षात गांजा सापडला. घटनास्थळावरून सुमारे ३ किलो गांजा जप्त करण्यात आला.
 
पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी पिंपरी-चिंचवड येथील त्यांच्या घरी आणखी अमली पदार्थ साठवून ठेवल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणीही छापा टाकला आणि तिथून आणखी १३ किलो गांजा जप्त केला. अशा प्रकारे एकूण १६ किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे.
 
हळदीच्या पाकिटांचा आडोसा घेऊन नशेचा माल विकण्याची ही पद्धत पाहून पोलिसही आश्चर्यचकित झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, या रॅकेटमागे आणखी कोणी आहे का याचा शोध घेतला जात आहे.
Powered By Sangraha 9.0