धक्कादायक घटना: वृद्धांना आधार देणाऱ्या वृद्धाश्रमातच वृद्धेचा अमानुष छळ

22 Mar 2026 14:56:47
मुंबई,
inhuman-torture-of-an-elderly-woman : मुंबईतील बोरिवलीच्या गोराई परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. वृद्धांना आधार देणाऱ्या एका वृद्धाश्रमातच 75 वर्षीय महिलेला अमानुष छळाला सामोरे जावे लागले. ही घटना 11 मार्च रोजी ‘साई सीनियर केअर फाउंडेशन’ या वृद्धाश्रमात घडल्याची माहिती आहे.
 

inhuman-torture-of-an-elderly-woman 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, या वृद्ध महिलेला वय आणि आजारपणामुळे वारंवार लघवीला जावे लागत होते. याचा राग केअर टेकर सुरेखा पवार हिला आला. संतापाच्या भरात तिने वृद्ध महिलेचे हात खाटेला बांधले आणि त्यांना झाडूने मारहाण केली. इतकेच नव्हे तर ही गोष्ट कुणाला सांगितली तर आणखी मारहाण करेल, अशी धमकीही दिल्याचे समोर आले आहे.
 
या घटनेनंतर वृद्ध महिला घाबरून गेल्या आणि त्यांनी काही दिवस कोणालाही काही सांगितले नाही. मात्र, त्यांच्या शरीरावरील जखमा आणि वागण्यात झालेला बदल पाहून नातेवाईकांना संशय आला. त्यानंतर चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. 20 मार्चपर्यंत हे प्रकरण लपलेले होते, मात्र नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
 
तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत केअर टेकर सुरेखा पवार हिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, वृद्धाश्रमातील इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. तसेच संबंधित वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनावरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, वृद्धांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Powered By Sangraha 9.0