जळगाव,
love-marriage-crime-case : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी एका तरुणाला पकडून त्याच्यावर गंभीर अत्याचार केले. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन जंगले या तरुणाने धनश्री पाटील या तरुणीसोबत नाशिक येथे जाऊन प्रेमविवाह केला. मात्र, हा विवाह मुलीच्या कुटुंबाला मान्य नव्हता. विवाहानंतर हे दोघे भुसावळ तालुक्यातील त्यांच्या नातेवाईकांकडे राहायला आले होते. याची माहिती मिळताच मुलीच्या नातेवाईकांनी संतापाच्या भरात त्या ठिकाणी धडक मारली.
तेथे त्यांनी तरुण आणि तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या दरम्यान तरुणावर अत्यंत क्रूर पद्धतीने हल्ला करण्यात आला. काही लोकांनी त्याला खांबाला बांधून लोखंडी रॉड आणि दगडांनी मारहाण केली. परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून गावातील काही लोकांनी मध्यस्थी करत तरुणाची सुटका केली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले आहे. तसेच, आरोपींनी तरुणाच्या कुटुंबीयांनाही धमक्या दिल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. एकूण १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास सुरू असून, या प्रकारामुळे समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.