पुणे,
Maharashtra Kesari : पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने दमदार कामगिरी करत मानाचा किताब जिंकला. अंतिम लढतीत त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला ४-३ अशा चुरशीच्या फरकाने पराभूत करत ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होण्याचा मान पटकावला.
या अंतिम सामन्यात दोन्ही मल्लांनी सुरुवातीपासूनच जोरदार आणि आक्रमक खेळ केला. महेंद्र गायकवाडने पहिला गुण मिळवत आघाडी घेतली होती, मात्र हर्षवर्धनने लगेचच बरोबरी साधली. सामना अत्यंत अटीतटीचा झाला होता. एका टप्प्यावर ऍक्टिव्हिटी वेळेत गुण न मिळाल्याने हर्षवर्धनला अतिरिक्त गुण मिळाला. शेवटच्या क्षणी दोन गुण मिळवत त्याने निर्णायक आघाडी घेतली आणि सामना जिंकला.
या स्पर्धेत माती आणि गादी अशा दोन विभागांमधून मल्ल अंतिम फेरीत पोहोचले होते. माती विभागातून महेंद्र गायकवाडने प्रवेश मिळवला होता, तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर अंतिम लढतीत पोहोचला होता. दोघांनीही आपापल्या विभागात विजेतेपद मिळवून मुख्य लढतीसाठी पात्रता मिळवली होती.
माती विभागाच्या अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखवर ३-० अशी मात करत विजय मिळवला होता. ही लढतही खूपच चुरशीची झाली होती. तर गादी विभागाच्या अंतिम सामन्यात हर्षवर्धनने जय पाटीलला एकतर्फी पराभूत केले. त्याने १०-० अशा फरकाने सामना जिंकत आपली ताकद दाखवून दिली.
दरम्यान, या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक माजी महाराष्ट्र केसरी विजेत्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील आणि पृथ्वीराज मोहोळ यांना अंतिम फेरीपूर्वीच पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे यंदाची स्पर्धा अधिकच रंगतदार ठरली.
विजेत्या हर्षवर्धन सदगीरला मानाची चांदीची गदा, टोयोटा फॉर्च्यूनर ही आलिशान कार आणि ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. या विजयानंतर हर्षवर्धनने पुन्हा एकदा आपल्या नावावर महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब कोरला आहे.