शेजारीच निघाला मुलीचा मारेकरी
बोथ येथील घटना : ५ आरोपी पकडले
दारव्हा,
जुन्या वादातून दारव्हा तालुक्यातील बोथ येथील शिवानी पंकज जाधव या ७ वर्षीय मुलीचा तिच्या शेजार्यांनीच खून केल्याचे आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन शिवानी जाधव हिचे अपहरण झाल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात नीलेश नथ्थुसिंग जाधव यांनी तक‘ार दाखल केली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी तपास सबंधाने दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांना जबाबदारी सोपविली होती.
शनिवार, मार्च रोजी अपहृत मुलीचा काही ठावठिकाणा मिळून येत नसल्याने पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी बोथ येथे स्वतः हजर राहून सर्व संशयित ग‘ामस्थांच्या घराची झडती घेण्याच्या सूचना केल्या. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक व आरसीपी पथकातील अंमलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, दारव्हा ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा यांची ८ पथके करुन सर्व संशयित ग‘ामस्थांच्या घरांची झडती मोहीम राबविण्यात आली. हा शोध शेतशिवार, विहिरींमध्येही घेण्यात आला. घटनास्थळापासून वेगवेगळ्या भागांत पोलिसांनी ही शोधमोहीम सुरू केली होती. सोबतच श्वानपथकही असल्यामुळे श्वानाने शेजारच्या घरावरच कक्ष केंद्रीत केले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर स्वत: पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी त्या घरात जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना अडवण्यात आले. त्यामुळे संशयात भरच पडली.
या शेजारच्या कैलास जाधव याच्या घरात घुसून झडती घेत असताना पलंगाखाली एक पोते आढळून आले. त्याबद्दल विचारले असता त्यात टरबूज आहेत असे कैलासने सांगितले. तरीही पोलिसांनी ते पोते तपासले असता त्यात निरागस शिवानीचा मृतदेहच आढळून आला आणि सारेच हादरून गेले. या प्रकरणी कैलास विलास जाधव (वय ३०), माला विलास जाधव (वय २६), सोनी विलास जाधव (वय ३२), रंजना सोनू जाधव (वय ३०) व आणि एक अल्पवयीन मुलगा अशा पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अंतर्गत कलम १३७ (२), १०३, २३८ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरु ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता व अपर अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात, उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक सतीश चवरे, दारव्हा ठाणेदार शिवप्रकाश मुळे, मनीष गांवडे, पवन राठोड, धीरज बांडे, सहनिरीक्षक दिनेश गावंडे, पंकज दाभाडे, योगेश वाघमारे, उपनिरीक्षक कोरपे, देशमुख, जांभेकर व त्यांच्या सहकार्यांनी पाडली.
नेमके कारण मात्र गुलदस्तात
शेजारच्या जाधव कुटुंबाने शिवानी पंकज जाधव या पहिल्या वर्गात शिकणार्या ७ वर्षीय निरागस मुलीला का संपवले हे मात्र पोलिस, गावकरी आणि शिवानीच्या कुटुंबालाही नेमके अजून कळत नाही आहे.