स्वातंत्र्यानंतरही हिवरा गाव वनवासातच!

22 Mar 2026 17:45:48
लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षानंतर गावकरी सरसावले
विजय माहुरे
सेलू, 
Village Development देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे पूर्ण झाली. गगनाला भिडणार्‍या विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत, मात्र हिंगणघाट मतदारसंघातील हिवरा (बांगडे) गावाची अवस्था पाहिल्यास विकास नेमका कुठे गेला, असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधींच्या सततच्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या गावकर्‍यांनी अखेर कोणाचीही वाट न पाहता लोकवर्गणी गोळा केली आणि विजय उराडे (महाराज) यांच्या पुढाकारातून हिवरा-पिपरा पांदण रस्त्याच्या साफसफाई व मातीकरणाचे काम स्वबळावर सुरू केले आहे.
 
 
Village Development
 
एकेकाळी ५०० लोकवस्तीचे हे समृद्ध गाव आज रस्ता आणि मुलभूत सोयींअभावी ओसाड पडू लागले आहे. पया रस्त्याअभावी येथील नागरिकांनी स्थलांतर केले असून, आज गावात जेमतेम ५० नागरिक उरले आहेत. विशेष म्हणजे, आजच्या हायटेक युगातही या गावाने अद्याप बसचे तोंड पाहिलेले नाही. रस्ता नसल्याने बस येत नाही आणि बस नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना दररोज पायपीट करावी लागते. या रस्त्याची अवस्था इतकी भीषण आहे की, साधी बैलबंडी सुद्धा या मार्गावरून नीट नेता येत नाही. पावसाळ्यात तर हा रस्ता चिखलमय बनतो. आजारी रुग्ण किंवा गरोदर मातांना दवाखान्यात न्यायचे असल्यास डोली करून न्यावे लागते. निवडणुका आल्या की नेते मतांच्या झोळीसाठी येतात, पण आमच्या हकाच्या रस्त्यासाठी कोणीही फिरकत नाही.
 
 
Village Development  तीन दशकापूर्वी माजी आमदार स्व. प्रमोद शेंडे यांनी या रस्त्याचे मातीकरण केले होते. त्यानंतर मतदारसंघाच्या पुनर्रचनेत हे गाव हिंगणघाट मतदारसंघात आले. गेल्या १२ वर्षांपासून आ. समीर कुणावार या भागाचे नेतृत्त्व करत आहेत. मात्र, या दुर्गम भागाचा प्रश्न त्यांच्या अजेंड्यावर कधी आलाच नाही. ग्रामस्थांनी अनेकदा निवेदने दिली, उंबरठे झिजवले, पण पदरी फत आश्वासनांची बोळवण पडली. हिवरा शिवारात ‘रिठाचा मारूती’ म्हणून प्रसिद्ध असलेले ३५० वर्षांचे प्राचीन हनुमान मंदिर आहे. संपूर्ण विदर्भातून भाविक येथे नवसाला येतात. मात्र, रस्ता नसल्यामुळे भाविकांना आणि महाप्रसादासाठी येणार्‍यांना मोठी कसरत करावी लागते. धार्मिक पर्यटन वाढण्याची संधी असताना केवळ रस्त्याअभावी या क्षेत्राचा विकास खुंटला आहे.
 
 
Village Development  प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गेंड्याची कातडी पांघरून बसल्याने अखेर विजय उराडे (महाराज) यांच्या नेतृत्त्वात गावकर्‍यांनी स्वतः कंबर कसली आहे. या रस्त्यासाठी गावातील १५ शेतकर्‍यांनी प्रत्येकी २ हजार रुपये लोकवर्गणी जमा केली. जमा झालेल्या निधीतून हिवरा-पिपरा रस्त्यावरील १ किमी अंतराचे मातीकरण व जेसीबीच्या साहाय्याने झाडेझुडपे काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. गावकर्‍यांनी स्वबळावर सुरू केलेले हे काम सध्याच्या यंत्रणेच्या तोंडावर एक मोठी चपराक मानली जात आहे.

आम्ही किती दिवस लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांवर जगणार? आमच्या मुलांचे शिक्षण आणि आरोग्य रस्त्याअभावी टांगणीला लागले आहे. त्यामुळे आम्ही स्वतःच पैसे गोळा करून रस्ता दुरुस्तीचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रीया हिवरा येथील शेतकरी विजय उराडे (महाराज) यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.
Powered By Sangraha 9.0