घायाळ खामेनी अधिक घातक

23 Mar 2026 06:00:00
दिल्ली दिनांक
रवींद्र दाणी
सत्ता आणि संताप! सत्तेची धुंदी आणि संतापाचा उद्रेक- या दोन मानसिक अवस्थांचे रसायन फार घातक असते. हे अनुभवले आहे. १९४७ च्या विभाजनानंतर भारतात झालेली सर्वाधिक भयावह दंगल होती- दिल्लीची. १९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली, राजीव गांधी पंतप्रधान झाले. नव्याने मिळालेली सत्ता आणि आपल्या आईच्या हत्येचा स्वाभाविक संताप या रसायनातून दिल्लीत तीन दिवस दंगल सुरू होती. दिल्लीचा सारा आसमंत मानवी मांसाच्या जळक्या वासाने कुंद झाला चार हजारांवर लोक तीन दिवसांत ठार झाले होते. इराणचे नवे सर्वोच्च नेते Motaba Khamenei मोताबा खामेनी यांचे आई-वडील, पत्नी, एक मुलगा असे चार जवळचे नागरिक पहिल्या दिवशीच्या हल्ल्यात ठार झाले. आता हेच खामेनी इराणचे नेते झाले आहेत. त्यांना अगोदरच कट्टरपंथी मानले जाते. आपल्या कुटुंबातील चार सदस्य गमावल्यानंतर त्यांच्याजवळ आणखी गमावण्यासारखे काही आपल्याला केव्हाही ठार केले जाऊ शकते याची पूर्ण कल्पना त्यांना आहे. सत्ता, संताप आणि कोणत्याही दिवशी येऊ शकणारा संभाव्य मृत्यू याचे प्रतिबिंब त्यांच्या बेदरकार निर्णयात दिसत आहे. आणि याने सारे मध्यपूर्व आगीच्या ज्वाळांमध्ये धुमसू लागले आहे.
 
 
KHANEME
 
दोघेही बेदरकार : इराणचे सर्वेसर्वा Motaba Khamenei मोताबा खामेनी बेदरकारपणे वागत असताना, जगातील सर्वांत शक्तिशाली नेतेही बेदरकार वागत आहेत. इराणचे युद्ध सुरू झाले ते त्याच्या आण्विक प्रकल्पावरून आणि आता ते स्थिरावले आहे- इराणच्या हार्मूझ खाडीवर. इराणने ही खाडी बंद केली आहे. ती पुन्हा जहाजांसाठी सुरू करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करीत आहे. राष्ट्रपती ट्रम्प यांच्यासाठी तो जणू प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे. इराण ही खाडी बंद करील आम्हाला वाटले नव्हते असे अमेरिकन प्रशासनाने सांगितले आहे. अमेरिकन अधिकार्‍यांचे हे विधान बालिशच म्हणावे लागेल. इराणवर हल्ला झाल्यास तो जगाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी ही खाडी बंद करील हे अमेरिकेने गृहीत धरावयास हवे होते. त्याचा विचारही अमेरिका व राष्ट्रपती ट्रम्प यांनी केला नव्हता. इराणच्या निर्णयानंतर आता ते जागे झाले आहेत.
 
 
योजनाच नाही : अमेरिका-इराण युद्धाबाबत माजी राष्ट्रपती बिल क्लिटंन नियमित भाष्य करीत आहेत. हार्मूझ खाडी प्रकरणावर त्यांनी म्हटले आहे, ‘‘मी राष्ट्रपती असताना, इराणच्या विरोधात काही निर्णय घेण्याचा विचार मी निश्चित केला होता. मात्र, ते निर्णय घेण्यापूर्वी, माझ्या निर्णयावर इराणची प्रतिक्रिया काय असेल याचा अंदाज घेण्यास मी सीआयएला सांगितले होते आणि वेळी सीआयएने मला, इराण हार्मूझची खाडी बंद करण्याचा निर्णय घेईल असे सांगितले होते.’’ इराणचे युद्ध सुरू करण्यापूर्वी अमेरिकन प्रशासनाने याचा अंदाज घेतला नव्हता काय, असा भेदक प्रश्न क्लिटंन यांनी विचारला आहे. विशेष म्हणजे क्लिटंन यांनी एकदाही राष्ट्रपती ट्रम्प यांचे नाव घेतलेले नाही. अमेरिकेने हे युद्ध सुरू तर केले, पण व्यूहरचना न करता. आपल्या मित्रराष्ट्रांना विश्वासात न घेता आणि घटनात्मकदृष्ट्या आवश्यक असणार्‍या अमेरिकन काँग्रेसची मंजुरी न घेता.
 
 
जनसमर्थन : अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर तेथील जनता आपल्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर येईल आणि आपण या देशात सत्ताबदल घडवून आणू असा अमेरिकेचा अंदाज होता. तसे काहीही झालेले नाही. इराणची जनता रस्त्यावर उतरत पण, आपल्या सरकारच्या विरोधात नाही तर अमेरिकेच्या विरोधात. अमेरिकेला नाही तर आपल्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी.
अधिक हिंसाचाराकडे? : राष्ट्रपती ट्रम्प आता याला आवर घालण्याची तयारी करीत आहेत काय? त्यांच्या एका निर्णयावरून तो निष्कर्ष काढला जात आहे. यूएसएस ट्रिपोली ही अमेरिकेची युद्धनौका जपानच्या बंदरावर तैनात होती. तिला इराणकडे जाण्यास सांगण्यात आहे. या नौकेवर २५०० अमेरिकन सैन्य असून, समुद्र किनार्‍यावर उतरण्याची व्यवस्था या जहाजावर आहे. म्हणजे आजवर केवळ हवाई हल्ले करणारी अमेरिका, आता इराणमध्ये आपले सैन्य उतरवून तेथे सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करणार काय, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. तसा प्रयत्न झाल्यास त्याला स्थानिक इराणी नागरिक जोरदार प्रतिकार करतील मानले जाते. कारण, एका घटनेने इराणी जनमत अमेरिकेच्या विरोधात गेले आहे.
 
 
निर्णायक वळण : Motaba Khamenei इराण विरोधातील हे युद्ध अमेरिकेच्या विरोधात जाणारे निर्णायक वळण होते एका शाळेवर झालेला हल्ला व त्यात १७० विद्यार्थिनींचे ठार होणे. प्रथम तर अमेरिकेने या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार ठरविले होते. पण, ज्या तोमाहॉक प्रक्षेपणास्त्राने हा हल्ला आला, ते तोमाहॉक प्रक्षेपणास्त्र अमेरिकेत तयार होते. त्यामुळे इराणच्या या आरोपाचा अमेरिकेला फार प्रतिवाद करता आला नाही. आता समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, ज्या शाळेवर हा हल्ला करण्यात आला, ती शाळा पूर्वी इराणी लष्कराचे एक केंद्र होती. तशी नोंद अमेरिकेजवळ होती. नंतर इराणने हे केंद्र बंद करून, लष्कराची ही इमारत सुरू करण्यासाठी दिली. मात्र हा नवा बदल अमेरिकन लष्कराजवळ नव्हता. त्यांनी त्या इमारतीला लष्करी केंद्र समजून त्यावर हल्ला चढविला आणि त्यात १७० विद्याथिर्र्नी ठार झाल्या. हा या युद्धातील एक निर्णायक टप्पा ठरला व इराणी जनमत अमेरिकेच्या विरोधात गेले.
 
 
नवा भडका : इराणने हार्मूझची खाडी बंद केल्यापासून जगात कच्च्या तेलाच्या अपेक्षितपणे वाढल्या आहेत. आता ही खाडी खुली करण्यासाठी चीन, फ्रान्स, ब्रिटन यांनी आपापल्या युद्धनौका पाठवाव्यात असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणने ही खाडी बंद करण्याचा निर्णय घेतला, तोच मुळी चीनच्या सांगण्यावरून आणि ट्रम्प चीनने ही खाडी मोकळी करण्यासाठी आपल्या युद्धनौका पाठवाव्यात असे म्हणत आहेत. ही खाडी बंद झाल्याने चीनचे बिघडणारे नाही. त्याला तर जगात हाहाकार हवा आहे. जगात आर्थिक हाहाकार झाल्यास, आपल्या अर्थव्यवस्थेला उठाव मिळेल असे त्याचे आकलन आहे. इराण आता अमेरिकन बँकांना लक्ष्य करीत आहे, जे चीनला हवे आहे.
 
 
अमेरिकेने लष्करी ताकदीच्या बळावर ही खाडी खुली करण्याचा प्रयत्न केल्यास, इराण अधिक संतप्त होत, आखाती देशांत अमेरिकेच्या प्रतिष्ठानांवर अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांच्या महत्त्वाच्या प्रतिष्ठानांवर हल्ले चढवीत आहे. याने हा संघर्ष अधिक भीषण होईल, अशी शक्यता आताच वर्तविली जात आहे.
 
 
जागतिक परिणाम : रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला, पण तो मर्यादित होता. या युद्धाची किंमत प्रामुख्याने रशिया व युक्रेन यांना मोजावी लागत आहे. पण, मध्यपूर्वेत सुरू या युद्धाचे मात्र तसे होणार नाही. युद्ध सुरू होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ७३ डॉलर प्रति बॅरल या दराने मिळत होते. आता ते ११० डॉलरपर्यंत पोहोचले आहे. याचा अर्थ युद्धाचा परिणाम सार्‍या जगावर होणार आहे. या स्थितीचा फायदा उठवीत रशियानेही आपल्या तेलाची किंमत वाढविली असल्याचे समजते. आता त्याने भारताला दरात तेल देण्यास नकार दिला आहे. भारताने अमेरिकेच्या आग्रहाखातर आपल्याकडून तेल घेणे बंद केले होते ही बाब रशियाला पटलेली नाही. खाडी युद्धात जुनी जागतिक समीकरणे कोलमडून पडणार आणि नवी समीकरणे आकार घेणार. युद्धानंतरचे नवे जग कसे असेल? नवी समीकरणे कशी असतील? जगाच्या बदलणार्‍या चेहर्‍यामोहर्‍याची कल्पना सध्या मात्र कुणालाही करता नाही. पप
Powered By Sangraha 9.0