अश्विनच्या विधानाने अर्जुन तेंडुलकर चर्चेत!

23 Mar 2026 12:51:07
नवी दिल्ली,
Arjun Tendulkar in the news भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन यांनी आयपीएल २०२६ पूर्वी युवा गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याच्या भवितव्याबाबत केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, लखनौ संघात आधीच अनुभवी आणि वेगवान गोलंदाजांची मजबूत फळी असल्याने अर्जुनला अंतिम संघात स्थान मिळणे अत्यंत कठीण ठरू शकते. आयपीएल लिलावाआधी अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सकडून लखनौ सुपर जायंट्सकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. या बदलामुळे त्याला नवीन संघात अधिक संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना, अश्विन यांनी मात्र वेगळे मत मांडले आहे. त्यांच्या मते, लखनौ संघात मयंक यादव, एनरिच नॉर्टजे, मोहम्मद शमी, मोहसिन खान, आवेश खान आणि आकाश सिंग यांसारखे तगडे वेगवान गोलंदाज असल्यामुळे स्पर्धा अत्यंत तीव्र आहे.

arjun
 
 
अश्विन यांनी त्यांच्या ऑनलाइन कार्यक्रमात बोलताना असेही सांगितले की, सध्याच्या संघरचनेनुसार अर्जुनला खेळण्याची संधी मिळणे जवळजवळ अशक्य आहे, जोपर्यंत संघात मोठ्या प्रमाणावर दुखापती होत नाहीत. त्यांच्या या विधानामुळे क्रिकेट वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून, चाहत्यांमध्येही यावर चर्चा रंगली आहे.अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत आयपीएलमध्ये मोजक्याच सामन्यांमध्ये सहभाग घेतला आहे. मुंबई इंडियन्सकडून त्याला प्रथम संधी मिळाली आणि नंतर त्याने काही सामन्यांत आपली क्षमता दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र सातत्याने संधी मिळाली नाही. आता लखनौकडून त्याला खेळण्याची अधिक संधी मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
दुसरीकडे, लखनौ संघाबाबत बोलताना अश्विन यांनी संघाच्या एकूण कामगिरीबाबतही भाष्य केले. त्यांच्या मते, मागील काही हंगामातील कामगिरी पाहता या संघासाठी स्पर्धेत अव्वल स्थान मिळवणे कठीण आहे. त्यांच्या अंदाजानुसार, संघाला पहिल्या सहा स्थानांमध्येही स्थान मिळवणे अवघड ठरू शकते.आयपीएल २०२६ मध्ये लखनौ संघ आपला पहिला सामना एक एप्रिल रोजी दिल्ली संघाविरुद्ध खेळणार असून, या हंगामात त्यांची कामगिरी कशी राहते आणि अर्जुन तेंडुलकरला संधी मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0