भंडारा,
ram rajya प्रभू श्रीराम वनवासात निघाले अन अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले... आपसूकच दोन्ही कर जुळले आणि विनम्रपणे प्रेक्षक नतमस्तक झाले. प्रभूंच्या या वियोगाच्या प्रसंगासह श्रीरामांच्या चरित्रावर आधारित एकाहून एक सरस प्रसंग साकारून असरच्या कलावंतांनी जिवंत रामायणच भंडारेकरांपुढे मांडले. खचाखच भरलेल्या सभागृहतील एकही प्रेक्षक संपूर्ण कलाकृती दरम्यान उठून गेला नाही, आणि हिच खरी पावती ठरली. कधी पाणावलेले डोळे, कधी आनंद तर कधी श्रीरामांचा जयघोष अशा वातावरणात एक वेगळी अनुभूती रामभक्तांनी घेतली.

श्रीराम शोभायात्रा समिती भंडाराच्या वतीने गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे स्थानिक कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने घेतले जाणारे कार्यक्रमांनी आपली वेगळी छाप सोडून जातात, याचा अनुभव यां दरम्यान येतो. असाच एक "असर"दार प्रयोग भंडाऱ्याच्या असर फाउंडेशनच्या कलावंतांनी सादर करून पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. सादर करण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांच्या जीवन चरित्रावर आधारित नटीकेने रामराज्यच सभागृहात उभे केले. केवळ एवढेच करून कलावंत थांबले नाही तर त्यांनी उपस्थित प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत कधी त्यांच्या डोळ्याचा कडा ओल्या केल्या, तर कधी आनंदाने जयघोष करण्यासाठी ऊर्जाही दिली. श्रीरामांचा जन्म, सीता स्वयंवर, राजा दशरथ यांनी केलेली वचनपूर्ती आणि त्यानंतर वनवासाला निघालेले प्रभू श्रीराम या प्रसंगांनी प्रेक्षकांना राम राज्यात नेले. सीतेला मोहित करण्यासाठी आलेला सुवर्ण मृग उत्कृष्ट कलावंतांची जाणीव करून देणारा ठरला. अभिनय काय असतो, हे रावणाच्या भूमिकेतील कलाकाराने दाखवून दिले. सीता हरणाचा प्रसंग नंतर सीता आणि हनुमंताची भेट रामर आणि सरते शेवटी राम रावणाचे झालेले युद्ध काही तासातच संपूर्ण रामायणाची अनुभूती देऊन गेला. प्रत्येक प्रसंगावर व्यक्त होणारा प्रेक्षक आज सभागृहात पाहायला मिळाला. वनवासाला निघालेल्या रामासमोर नतमस्तक होणाऱ्या पासून ते रावणाच्या वधानंतर श्रीरामांचा जयघोष करणारेही सभागृहाने अनुभवले. प्रत्येक कलाकाराने त्याच्या भूमिकेत जाऊन प्रेक्षकांपुढे मांडलेले पात्र एका जिवंत कलाकृतीचे दर्शन घडवून गेले.ram rajya म्हणूनच तर सलग दोन तास सभागृहातून एकही पाऊल बाहेर पडले नाही. भंडारेकरांना रामराज्याचे दर्शन घडविणाऱ्या कलावंतामध्ये वैभव कोलते, दीपक तिघरे, विक्रम फडके, अथर्व फडके, हर्षल कुंभारे, अक्षय निमजे, अमर चकोले, अंकित बत्रा, आशिष बैस, मिलिंद मलेवार, शौर्य तीघरे, पवन सेलोकर, वैदेही हाडगे, प्रियंका कोलते, दामिनी सेलोकर, तनुश्री माहुरकर, स्नेहा तिडके, प्राची बागडे, प्राची देशपांडे, शैलती कोलते यांचा समावेश होता. शेवटी श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या हस्ते असर फाउंडेशनच्या कलावंतांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला गेला.