९८ वर्षांची परंपरा जपत ‘रिगाटा महोत्सव’ उत्साहात

23 Mar 2026 18:37:58
पुणे
COEP Regatta Festival Pune जलक्रीडा, परंपरा आणि विद्यार्थ्यांच्या अद्वितीय कौशल्याचा संगम असलेला सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा ऐतिहासिक ‘रिगाटा महोत्सव’ यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल ९८ वर्षांची परंपरा लाभलेल्या या महोत्सवाने पुन्हा एकदा पुणेकरांना नेत्रदीपक जलप्रात्यक्षिकांचा थरार अनुभवण्याची संधी दिली.
 

COEP Regatta Festival Pune 
मुळा नदीच्या काठावर रंगलेल्या या महोत्सवात विविध प्रकारच्या नौकांच्या सहाय्याने आकर्षक आणि रोमांचक सादरीकरणे करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जलक्रीडा प्रकारांनी उपस्थित प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली. कायक बॅले, शेल गेम्स, पंट फॉर्मेशन आणि टेलिमॅचेस यांसारख्या प्रकारांनी कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. प्रत्येक सादरीकरणात विद्यार्थ्यांचा समन्वय, शिस्त आणि मेहनत स्पष्टपणे जाणवत होती.
१९२८ साली सुरू COEP Regatta Festival Pune  झालेला हा महोत्सव केवळ क्रीडा स्पर्धा नसून सांघिक भावना आणि परंपरेचा उत्सव म्हणून ओळखला जातो. या परंपरेचा वारसा जपत आजही विद्यार्थी अत्यंत उत्साहाने आणि समर्पणाने या कार्यक्रमात सहभागी होतात. या वर्षीही विद्यार्थ्यांनी महिनोनमहिने सराव करून सादरीकरणांची तयारी केली होती, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला.रात्रीच्या सत्रात सादर करण्यात आलेल्या प्रकाशमय जलप्रदर्शनांनी महोत्सवाला विशेष आकर्षण प्राप्त झाले. प्रकाश, संगीत आणि जलक्रीडा यांचा संगम पाहताना प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. या थरारक सादरीकरणांनी संपूर्ण परिसर उत्साहाने भारून गेला.दरवर्षीप्रमाणे यंदाही रिगाटा महोत्सवाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक परंपरेचा आनंद लुटला.पुण्याच्या सांस्कृतिक आणि क्रीडा वैभवाचा अविभाज्य भाग असलेला हा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले.
Powered By Sangraha 9.0