तेहरान,
Iran US War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर तात्काळ हल्ला न करण्याचा निर्णय घेत पुढील ५ दिवस कारवाई स्थगित ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या दोन दिवसांत सकारात्मक चर्चा झाली असून पुढील काही दिवसांत आणखी संवाद होणार आहे. मात्र इराणने हा दावा फेटाळून लावत, ट्रम्प यांच्याशी कोणतीही थेट चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
याआधी ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम देत होर्मुझ सामुद्रधुनी खुली न केल्यास तेहरानवर मोठा हल्ला करण्याची धमकी दिली होती. अमेरिकेकडून वीज प्रकल्प आणि पायाभूत सुविधा लक्ष्य करण्याची तयारी असल्याचेही सांगण्यात आले होते. यावर प्रत्युत्तर देताना इराणनेही कठोर भूमिका घेत, हल्ला झाल्यास मध्यपूर्वेतील अमेरिकन हितसंबंधांवर जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला होता.
इराणी माध्यमांच्या अहवालानुसार, इराणच्या या ठाम भूमिकेमुळेच अमेरिका मागे हटल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र अधिकृत पातळीवर इराणकडून ट्रम्प यांच्या वक्तव्यावर अद्याप स्पष्ट प्रतिक्रिया आलेली नाही. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील तणाव कायम असून पुढील काही दिवसांत परिस्थिती कशी बदलते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.