ट्रम्पच्या निर्णयानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण

23 Mar 2026 21:24:35
नवी दिल्ली,
crude-oil-prices-plunge : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर तेल बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. इराणवरील संभाव्य हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाजारातील तणाव कमी झाला आणि त्याचा थेट परिणाम तेलाच्या किमतींवर दिसून आला.
 

crude-oil-prices-plunge 
 
 
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर एप्रिल डिलिव्हरीसाठी कच्च्या तेलाच्या किमतींनी सुरुवातीला वाढ दाखवली होती. दर सुमारे ४ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ९,६२० रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र त्यानंतर अचानक मोठी घसरण झाली आणि किंमती सुमारे ९ टक्क्यांनी घसरून ८,४३१ रुपयांवर आल्या, ज्यामुळे लोअर सर्किटही लागला.
 
आंतरराष्ट्रीय बाजारातही अशीच स्थिती दिसून आली. ब्रेंट क्रूडची किंमत १०० डॉलरच्या खाली घसरली, तर WTI क्रूडमध्येही मोठी घसरण झाली. या घडामोडींचे मुख्य कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने बाजारात सकारात्मक संकेत मिळाले.
 
विशेष म्हणजे, याआधी मध्यपूर्वेतील संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. मात्र ट्रम्प यांनी हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि बाजारात किंमती घसरल्या. तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवस अमेरिका-इराण चर्चेवर बाजाराचे लक्ष राहणार असून, त्यानुसार तेलाच्या किमतीत आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0