वर्धा,
Dutta Meghe will state honors विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत अधिकृत आदेश जारी केल्यानंतर अंत्यसंस्काराची सर्व तयारी वेगाने सुरू करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील पवणार येथील त्यांच्या शेतात अंतिम संस्कार होणार असून, दुपारी सुमारे दोन वाजता पार्थिव सावंगी मेघे येथे आणले जाणार आहे. त्यानंतर दुपारी दोन ते चार या वेळेत नागरिकांना अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल. सायंकाळी पाच वाजता पवणार येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीची शक्यता वर्तवली जात आहे. दत्ता मेघे यांच्या निधनाने विदर्भातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.