परभणी,
Family accident in Parbhani; Four killed परभणी जिल्ह्यात जिंतूर-चारठाणा महामार्गावर ईदनिमित्त नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. टेम्पो ट्रॅव्हलर आणि कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला असून या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वसमत येथील सय्यद कुटुंबीय कारने मंठा येथील नातेवाईकांकडे जात असताना, मंठ्याकडून जिंतूरकडे येणाऱ्या वाहनाशी त्यांची समोरासमोर धडक झाली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या या अपघातात धडक इतकी जोरदार होती की कार रस्त्याच्या बाजूला फेकली गेली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत सय्यद इस्माईल सय्यद मेहबूब, सय्यद सुमय्या अझर अली, अझर मेहमूद आणि सात वर्षांची सय्यद उपाध सय्यद या चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले, मात्र चौघांनाही वाचवता आले नाही.