आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ ठरला पाकचा फरहान

23 Mar 2026 15:33:01
इस्लामाबाद,
Farhan named Player of the Month आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी)फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूची घोषणा करत पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानची याची निवड केली आहे. अलीकडेच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकातील दमदार फलंदाजीच्या जोरावर त्याने हा मान पटकावला आहे. या स्पर्धेत फरहानने सात सामन्यांपैकी सहा डावांत उत्कृष्ट खेळ करत ३८३ धावा केल्या. त्याची सरासरी आणि फटक्यांची गती प्रभावी राहिली, तसेच त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावत प्रतिस्पर्ध्यांना चांगलेच अडचणीत टाकले. या कामगिरीमुळे तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. विशेष म्हणजे, एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहली यांचा विक्रमही त्याने मागे टाकला.
 
 
sahibzada farhan
 
पुरस्कार जिंकल्यानंतर फरहानने आपली भावना व्यक्त करत सांगितले की, जागतिक स्तरावरील स्पर्धेत केलेल्या कामगिरीसाठी हा सन्मान मिळणे अत्यंत खास आहे. संपूर्ण जगाच्या नजरा सामन्यांवर असताना अशी कामगिरी करणे हे प्रत्येक खेळाडूसाठी मोठे आव्हान असते, असे तो म्हणाला. ही स्पर्धा आपल्या कारकिर्दीत कायम लक्षात राहील आणि पुढील मालिकांमध्येही अशीच कामगिरी कायम ठेवण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही त्याने नमूद केले. सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच हे यश शक्य झाले, असे सांगत त्याने संघातील सर्वांचे आभार मानले.
 
फरहानने आतापर्यंत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करताना काही सामने खेळले असून, टी-२० प्रकारात त्याची कामगिरी विशेष ठरली आहे. सातत्यपूर्ण फलंदाजी आणि आक्रमक शैलीमुळे तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू बनला असून, पुढील काळातही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
Powered By Sangraha 9.0