‘त्या’ जीर्ण पूलावरून ‘जीवघेणा प्रवास’

23 Mar 2026 21:39:49
गोंदिया, 
gondia-news : जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघांना जोडणारा गोरेगाव तालुक्यातील पांगोली नदीवरील पूल पूर्णपणे जीर्ण झाला आहे. त्यामुळे हा पूल कधीही धराशाही होण्याच्या मार्गावर आहे. असे असताना या पुलावरून दरदिवशी शेकडो वाहनांची वर्दळ सुरू असून कधीही मोठे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, दोन मतदार संघाच्या मध्यभागी हा पूल असल्याने दोन्ही क्षेत्रांच्या लोकप्रतिनिधींकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी या जीर्ण पुलावरून परिसरातील नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे.
 
 
J
 
 
 
जिल्ह्यात अनेक मार्गावर विकास कामे होत असली तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्ये व त्यावरील कठडेरहित पुल नागरिकांच्या जीवावर उठले आहे. तिरोडा, देवरी, सड़क अर्जुनी आदी सर्व तालुक्यातील तालुका ते जिल्हा मुख्यालयाला जोडणार्‍या रस्त्यांवर असेच काही पुल मृत्यूला आमंत्रण देत आहेत. त्यापैकीच एक गोरेगाव-म्हसगाव या जिल्हा मार्गावरील पांगोली नदीवरील जीर्ण पूल आहे. तालुका मुख्यालयापासून अवघ्या दिड किमी अंतरावर घोटी ते म्हसगावदरम्यान पांगोली नदीवर ५० वर्षांपूर्वी लहान पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. तेव्हापासून या पुलावरून वाहतूक सुरू आहे. बांधकाम जुने झाले असताना आता वाहनात झालेली वाढ त्यात वाढलेली वाहनांची वर्दळ पाहता नव्याने पूलाचे बांधकाम होणे गरजेचे आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत, पूल वगळता दोन्ही बाजूंचे रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले असताना जीर्ण पुलाच्या दुरुस्तीसाठी कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. अनेक अपघात व पुराच्या पाण्याने या पुलावरील कठडे बेपत्ता झाले आहे. तर पूलाच्या बांधकामातील सळाखी आता बाहेर निघू लागल्या आहे. असे असले तरी संबंधित विभागाकडून याठिकाणी कसल्याच प्रकारच्या दिशादर्शक फलक अथवा सुचना या पुलावर लावण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावरील ये-जा करणार्‍यासाठी हा पुल कर्दनकाळच ठरू पाहत आहे.
 
 
दोन्ही आमदारांचे दुर्लक्ष ?
 
 
विशेष म्हणजे, गोरेगाव व घोटी हे गाव तिरोडा मतदार संघात येत असताना म्हसगाव हे गाव अर्जुनी मोरगाव मतदार संघात मोडते त्यात या दोन्ही मतदार संघाच्या मध्यभागी पांगोली नदीचे हे पूल असल्याने दोन्ही मतदार संघातील आमदारांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणने आहे.
 
 
पूल बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. सदर प्रस्तावाला मंजुरी मिळताच पुढील कार्यवाही सुरू केली जाईल.
-प्रमोद देशमुख, प्रभारी अभियंता, प्रधानमंत्री सडक योजना, गोंदिया
Powered By Sangraha 9.0