मुल्ला,
gondia-news : आमगाव-देवरी मार्गावर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक त्रास लक्षात घेत राज्य परिवहन महामंडळाने गोंदिया वरून देवरीकडे सकाळी ५.३० वाजे एसटी बस सुरू केलेली होती. सप्टेंबर महिन्यापासून एसटी बस नियोजित वेळेवर धावत असताना सद्यःस्थितीत तीच बस जवळपास एक तास उशिरा धावत आहे. या बसच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना तासिकांपासून वंचित हो व्हावे लागत आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या हातावर राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराने तुरी दिल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

आमगाव-देवरी मार्गावर हरदोली ते देवरी दरम्यानच्या गावातील विद्यार्थी देवरीला शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्याकरता ये-जा करतात. नियमित बस नसल्याने विद्यार्थ्यांना नेहमी तासिके पासून वंचित व्हावे लागत होते, दरम्यान, पालक वर्गाकडून थेट आमदार ते शिक्षण व परिवहन मंत्रालयापर्यंत समस्या मांडण्यात आली होती. त्यावर राज्य परिवहन महामंडळाने गोंदिया आगारांतर्गत सकाळी ५.३० वाजे बस सुरू केली होती. सप्टेंबर महिन्यापासून सदर बस देवरीला शालेय वेळेत विद्यार्थ्यांना नियमित पोचवत होती. मात्र जवळपास एक महिन्यापासून सदर बस दररोज उशिरा येत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात पोहचण्यात उशिर होत असून त्यांना तासिकांपासून वंचित रहावे लागत आहे. सद्यस्थितीत परीक्षेचे दिवस आहेत, अशावेळी तासिकारापासून वंचित होणे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मोठे शैक्षणिक नुकसान आहे. तेव्हा गंभीर बाबीकडे लक्ष देत राज्य परिवहन महामंडळातील जबाबदार अधिकारी-कर्मचार्यांनी याची तातडीने दखल घेत सदर बस नियमीत वेळेवर सोडावी अशी मागणी पालक वर्गांची आहे.