नागपूर फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये ‘दोन भवरे’ लघुपटाची निवड

23 Mar 2026 21:41:34
अर्जुनी मोरगाव,
nagpur-film-festival-2026 : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील कोदामेडी गावातील नाथजोगी समाजाच्या वास्तव जीवनावर आधारित ‘दोन भवरे’ या लघुपटाची नागपूर फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये अधिकृत प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
J
 
 
 
हा लघुपट नाथजोगी समाजातील भविष्य सांगून उदरनिर्वाह करणार्‍या कुटुंबांचे जीवन आणि त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष यावर आधारित आहे. विशेषतः पप्पू आणि सागर या दोन विद्यार्थ्यांच्या जिद्दीची आणि संघर्षाची कहाणी या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. या लघुपटाची कथा व निर्मिती प्रज्ञा शिक्षण संस्था, येरंडी (गोंदिया) चे अध्यक्ष इंजी. रत्नदीप दहिवले यांनी केली असून दिग्दर्शन हर्षकुमार यादव यांनी केले आहे. कोदामेडी येथील विद्यार्थी चिचाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय व बारव्हा येथील शशिकांत दैठनकर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतात. अत्यंत हुशार असूनही हे विद्यार्थी आपल्या वडिलांसोबत भिक्षा मागणे व भविष्य सांगणे अशा कामांत गुंतलेले असल्याने शिक्षणापासून वंचित राहतात, ही वस्तुस्थिती या लघुपटात दाखवण्यात आली आहे.
 
 
 
निरोप समारंभात संस्थेच्या अध्यक्षांनी जाहीर केलेल्या प्रत्येकी ५-५ हजार रुपयांच्या बक्षिसांमुळे प्रेरित होऊन या विद्यार्थ्यांनी स्वतःला अभ्यासात झोकून दिले आणि कनिष्ठ महाविद्यालयातून बारावी बोर्ड परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांच्या यशोगाथेनेच या लघुपटाची प्रेरणा मिळाली. या लघुपटाची संकल्पना नाथजोगी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात मांडण्यात आली होती. त्यावेळी भंडाराचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मताणी हेही उपस्थित होते.‘दोन भवरे ’ या लघुपटाचा प्रीमियर शो नुकताच गोंदिया जिल्ह्यातील एमटीडीसी रिसॉर्ट, नवेगावबांध येथे पार पडला. या कार्यक्रमाला माजी मंत्री व आमदार नितीन राऊत, माजी आ. मनोहर चंद्रिकापुरे, भंडारा को-ऑप बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, तसेच माजी आ. सुधाकर कोहळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या लघुपटाला नागपूर फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये २७ मार्च शुक्रवारला गोविंद असरानी ऑडिटोरियम राष्ट्र संत तुकडोजी महाराज विद्यापीठ येथे प्रदर्शित केला जाणार आहे. या व्यतिरिक्त चायना फिल्म फेस्टिव्हलसह इतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही पाठविण्याची तयारी सुरू आहे. सामाजिक वास्तव मांडणारा आणि प्रेरणादायी संदेश देणारा हा लघुपट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Powered By Sangraha 9.0