मोजक्या लोकांकडेच राजकारण सूत्रे असणे हे अमान्य

23 Mar 2026 21:56:38
निरंजन नाईक यांचे प्रतिपादन

पुसद, 
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे धाकटे चिरंजीव Niranjan Naik निरंजन नाईक यांनी चिंतामणी मंदिरानजीक प्रांगणात रविवार, 22 मार्च रोजी झालेल्या सभेत सुस्पष्टरित्या म्हटले की, मला राजकारण करायचे नाही, राजकारणात माझा रस नाही पण मोजक्या लोकांकडेच राजकारणाची सूत्रे असणे हे मान्य नाही.
 

ni
 
निरंजन नाईक पुढे म्हणाले, आदित्य जाधवसारख्या तरुणांनी राजकारणात पुढे आले पाहिजे. सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे गेले पाहिजे, निर्णय घेतले पाहिजेत. या ठिकाणी उल्लेखनीय असे की, निरंजन नाईक एवढ्यावरच थांबले नाहीत.
उपस्थित समाजबांधवांना त्यांनी आवाहन केले की, आदित्य जाधवांच्या टीमला सहकार्य करा. त्यांनी केलेले आवाहन पुसदच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे समजले जात आहे. ते असे की, पुसदमध्ये त्यांच्या सख्ख्या चुलत भावाचे सत्ता साम्राज्य आहे.
वसंतराव नाईक असतील, अविनाश वसंतराव नाईक असतील त्यांनी कधीही नाईक परिवाराबाहेरील तरुणाला सहकार्य करावे असे म्हटले नाही. यावरून निरंजन नाईक यांची आगामी वाटचाल कशी राहील, हे दिसून येते. सभेचे संचालन आणि आभारप्रदर्शन गोकुळ राठोड यांनी केले.

सेवालाल जयंतीचे निमित्त
Niranjan Naik सेवालाल जयंती पुसद येथे साजरी न झाल्याचे यासाठी निमित्त होते. अजित पवारांच्या निधनामुळे सेवालाल जयंती साजरी करायची नाही असा निर्णय राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी घेतला. परंतु आदित्य जाधव आणि नवयुवकांचे यावर समाधान झाले नाही. त्यांनी सेवालाल जयंतीनिमित्त सभा घेण्यासाठी यशवंत स्टेडियमची मागणी केली. पण ही मागणी मान्य झाली नाही. आदित्य जाधवांच्या चमूने निरंजन नाईक यांची सभा पुसद येथे घेण्याचे ठरविले परंतु त्यांना पुसद येथील कुठलेही सभागृह मिळाले नाही. तरीही त्यांनी पुसदपासून दूर असलेल्या चिंतामणी मंदिर परिसरात सभा घेतली.
 
 
साधनांची कमतरता असूनही केवळ समाज माध्यमांच्या साह्याने बंजारा समाजातील हजारो तरुण सभेला जमले आणि या सभेत पुसदच्या भावी राजकारणाची दिशा त्यांनी स्पष्ट केली. यावरून आगामी काळात पुसदच्या राजकारणात नवे प्रवाह दिसून येतील असा अंदाज आहे. Niranjan Naik निरंजन नाईक यांनी कोणावरही टीकाटिप्पणी केली नाही. पण पुसदच्या समस्या सोडविण्यात यश मिळाले तर माझ्या एवढा नशिबवान कोणी राहणार नाही आणि पुसदला जिल्ह्याचा दर्जा मिळाला पाहिजे, असे म्हटले. त्यावरून निरंजन नाईक आगामी काळात नव्या तरुण चमू सोबत राजकारणाची दिशा ठरवतील, असे दिसते.
Powered By Sangraha 9.0