ऑकलंड,
NZ20 League in New Zealand न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने देशांतर्गत टी-२० क्रिकेटमध्ये मोठा बदल घडवण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच नव्या धाटणीची स्पर्धा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. जगभरात लोकप्रिय ठरलेल्या फ्रँचायझी पद्धतीचा अवलंब करत ‘एनझेड२०’ नावाची नवी लीग सुरू करण्याचा विचार पुढे आला आहे. या निर्णयामागे न्यूझीलंडच्या क्रिकेटला अधिक बळकटी देणे आणि जागतिक स्तरावर त्याचे स्थान उंचावणे हा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ देशात टी-२० स्वरूपातील ‘सुपर स्मॅश’ ही स्पर्धा होत असली, तरी बदलत्या काळानुसार नव्या संकल्पनेची गरज भासू लागली होती. विविध देशांमध्ये सुरू झालेल्या मोठ्या लीग स्पर्धांच्या यशामुळे प्रेरित होऊन न्यूझीलंड मंडळानेही आता नव्या दिशेने पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या अध्यक्षा डायना पुकेटापू-लिंडन यांनी या संदर्भात सांगितले की, देशातील क्रिकेटची ओळख जपत त्याला नवसंजीवनी देण्यासाठी ही लीग महत्त्वाची ठरेल.
त्यांच्या मते, ही नवी स्पर्धा न्यूझीलंड क्रिकेटसाठी नवा टप्पा ठरेल. यामुळे केवळ आर्थिकदृष्ट्या मजबुती मिळणार नाही, तर देशातील उदयोन्मुख खेळाडूंना स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी एक मोठे व्यासपीठही उपलब्ध होईल. भविष्यातील क्रिकेटपटूंना जागतिक दर्जाच्या स्पर्धेचा अनुभव मिळणे, हा या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असेल. सध्या या लीगसंदर्भातील अंतिम निर्णय प्रक्रियेत असून, आवश्यक परवानग्या मिळवण्यावर भर दिला जात आहे. विविध तज्ज्ञांचे अहवाल आणि संबंधित घटकांशी चर्चा केल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेटचे जागतिक स्तरावरील महत्त्व अधिक वाढल्याचेही अधोरेखित झाले आहे. विशेषतः महिला संघाच्या अलीकडील यशामुळे आणि पुरुष संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे देशाच्या क्रिकेट प्रतिमेला मोठी उंची मिळाल्याचे मानले जात आहे.