जननी व जन्मभूमी याचे स्थान सर्वोच्च : विवेक घळसासी

23 Mar 2026 22:22:22
वणी, 
प्रभू श्रीराम हे ‘मर्यादा पुरुषोत्तम’ असून त्यांनी वेदांनी सांगितलेल्या धर्ममर्यादा आपल्या जीवनात आचरणात आणल्या. अथर्ववेदातील भूमिसूक्तात सांगितलेला राष्ट्रधर्म त्यांनी जगासमोर आदर्श रूपाने मांडला. राष्ट्ररक्षण हा सर्वश्रेष्ठ धर्म असून जननी आणि जन्मभूमी यांचे स्थान सर्वोच्च असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार Vivek Ghalsasi विवेक घळसासी यांनी केले. चैत्र नवरात्र महोत्सवानिमित्त येथील श्री जैताई देवस्थान येथे 22 ते 25 मार्च या कालावधीत ‘श्रीराम चरित्र दर्शन’ या विषयावर प्रवचनमालेत प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते. प्रवचनकार विवेक घळसासी यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वातून प्रभू श्रीरामांच्या चरित्रातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
 
 
vivik
 
 
ते म्हणाले, भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवतारांचे उद्दिष्ट राष्ट्रधर्माची स्थापना हेच असल्याचे सांगताना घळसासी यांनी श्रीकृष्णांनी धर्म संस्थापनेसाठी घेतलेल्या भूमिकेचेही विवेचन केले. साधूंचे रक्षण आणि दुर्गुणी सत्ताधीशांचा नाश करणे हे त्यांच्या जीवनकार्याचे प्रमुख ध्येय होते, असे त्यांनी नमूद केले. भोग आणि योग यांचा समतोल साधण्याचा संदेश देताना त्यांनी सांगितले की, भोगात अडकून न पडता जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्यावा, परंतु त्याची आसक्ती टाळावी. आत्मज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. तसेच धार्मिकता, अनुशासन आणि परमार्थ यांचे पालन करणे आवश्यक आहे.
 
 
प्रवचनात त्यांनी श्रीरामांच्या जीवनातील आदर्श उदाहरणे मांडली. राजा दशरथ यांच्या आज्ञेचे पालन करताना श्रीरामांनी 14 वर्षांचा वनवास पत्करला आणि त्यावेळी त्यांनी स्थितप्रज्ञतेने वागून आदर्श पुत्राचे कर्तव्य पार पाडले. आई-वडिलांच्या आज्ञेचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. वनवास काळात अयोध्यावासींनीही विरक्त जीवन जगून रामप्रेम व्यक्त केले, असे सांगताना जननी व जन्मभूमीची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न हाच खरा धर्म असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेवटी, मानवतेतील बंधुत्व, शुद्ध चारित्र्य आणि अढळ Vivek Ghalsasi  विवेक यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे भगवान श्रीराम असल्याचे सांगून त्यांनी रामतत्त्व आत्मसात करण्याचे आवाहन केले. विवेक घळसासी याचे स्वागत देवस्थानचे संचालक हरिहर भागवत यांनी केले. प्रास्ताविक सचिव मनू महाराज तुगनायत यांनी केले. सूत्रसंचालन सागर मुने यांनी केले.
Powered By Sangraha 9.0