आत्मदहनाचा इशारा मागे पण लढा कायम : गणेश अहिर

23 Mar 2026 21:52:37
मालेगाव, 
ganesh-ahir : मालेगाव नगरपंचायतीतील ऑफलाईन टेंडर प्रकरणावरून आत्मदहनाचा इशारा देणारे नगरसेवक गणेश अहिर यांनी अखेर प्रतिष्ठित नागरिकांच्या मध्यस्थीनंतर आपला निर्णय स्थगित केला आहे. मात्र माघार नाही, तर लढा कायम असा स्पष्ट संदेश देत त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे नव्याने निवेदन सादर करत सखोल चौकशीची जोरदार मागणी केली आहे.
 
 
K
 
 
 
अहिर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी त्यांनी ऑफलाईन टेंडर प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेत कामांना स्थगिती न दिल्यास आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर २० मार्च रोजी नगरपंचायतीकडून टेंडर प्रक्रिया नियमांनुसार पार पडल्याचे उत्तर देण्यात आले. मात्र हे उत्तर असमाधानकारक असल्याचे सांगत अहिर यांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह कायम ठेवले आहे. दरम्यान, शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी हस्तक्षेप करून अहिर यांना समजावून सांगितल्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा निर्णय तात्पुरता स्थगित केला. त्यामुळे शहरातील तणाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी प्रकरण अद्यापही चिघळलेलेच आहे. आता जिल्हाधिकारी स्तरावर कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण मालेगावचे लक्ष लागले आहे.
 
 
चौकशीची मागणी अधिक तीव्र
 
 
नवीन निवेदनात अहिर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये ऑफलाईन टेंडरची निविदा सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली होती का, याची चौकशी. टेंडर प्रक्रिया नियमांनुसार पार पडली का, याची खात्री. सुरू असलेल्या कामांमध्ये वापरलेल्या साहित्याची गुणवत्ता तपासणी. वापरलेल्या गौण खनिजांवर शासनाची रॉयल्टी भरली आहे का, याची पडताळणी. संपूर्ण प्रकरणाची १५ दिवसांत सखोल चौकशी. याशिवाय चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही कामांचे देयक अदा करू नये, अशी ठाम मागणीही त्यांनी केली आहे.
 
 
उत्तर असमाधानकारक
 
 
नगरपंचायतीने दिलेले उत्तर स्वीकारण्यास नकार देत हे उत्तर समाधानकारक नाही असे स्पष्ट सांगत गणेश अहिर यांनी प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे हा मुद्दा आता चौकशी आणि कारवाईच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
Powered By Sangraha 9.0