आयपीएल २०२६ साठी बीसीसीआयचे मोठे बदल

24 Mar 2026 10:49:06
नवी दिल्ली,
Big changes in BCCI भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल २०२६ साठी काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. येत्या २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या या हंगामात सर्व दहा संघांना हे नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, हे नियम थेट खेळाशी संबंधित नसून संघांच्या सराव, सामन्यापूर्वीच्या तयारी तसेच संघाच्या दैनंदिन व्यवस्थेशी निगडित आहेत. नवीन नियमानुसार, सामन्याच्या दिवशी कोणत्याही संघाला सराव किंवा तयारी करण्याची मुभा दिली जाणार नाही. यामुळे खेळाडूंना सामन्यापूर्वी विश्रांती आणि योग्य मानसिक तयारी करण्यावर भर देता येणार आहे. तसेच सराव सामन्यांच्या बाबतीतही मर्यादा घालण्यात आली असून, कोणत्याही संघाला दोनपेक्षा जास्त सराव सामने खेळता येणार नाहीत. अशा सामन्यांसाठी मंडळाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असेल आणि हे सामने साडेतीन तासांपेक्षा जास्त वेळ चालणार नाहीत, याचीही काळजी घेतली जाणार आहे.
 
 
Big changes in BCCI
 
सरावासाठी वापरण्यात येणाऱ्या नेट्सबाबतही स्पष्ट नियम ठरवण्यात आले आहेत. एक संघ दुसऱ्या संघाचे सराव नेट्स वापरू शकणार नाही. प्रत्येक संघाला स्वतंत्र नेट्स उपलब्ध करून दिले जातील. जरी दुसऱ्या संघाचे नेट्स रिकामे असले, तरीही त्यांचा वापर करण्यास परवानगी नसेल. ज्या मैदानावर यजमान संघ आपला पहिला सामना खेळणार आहे, त्या मैदानावर सामन्याच्या चार दिवस आधी कोणत्याही प्रकारचा सराव करण्यास मनाई करण्यात आली आहे. सरावासाठी वेगवेगळ्या विकेट्स उपलब्ध करून दिल्या जातील आणि यजमान संघाला प्रथम सरावाची संधी दिली जाईल. जर सलग सराव सत्रे होत असतील, तर प्रत्येक सत्रासाठी नवीन तयार केलेली खेळपट्टी वापरणे बंधनकारक असेल.
 
खेळाडूंच्या कुटुंबीय आणि मित्रांच्या प्रवासाबाबतही कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. खेळाडूंना त्यांच्या सोबत कुटुंबीय किंवा मित्रांना प्रवासासाठी घेऊन जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यांना संघाच्या अधिकृत बसमधूनच प्रवास करावा लागेल. याशिवाय, मैदानावर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांनी एलईडी बोर्डजवळ बसण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. या सर्व बदलांचा उद्देश स्पर्धेतील शिस्त वाढवणे आणि सर्व संघांना समान संधी मिळवून देणे हा असल्याचे मानले जात आहे.
Powered By Sangraha 9.0