कोलंबिया,
Colombian plane crash दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया येथे विमान दुर्घटना घडली असून यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. लष्करी दलातील जवानांना घेऊन जाणारे एक विमान उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच कोसळले. या अपघातात आतापर्यंत सुमारे ६६ सैनिकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली असून अनेक जवान अद्याप बेपत्ता आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात एकूण १२५ जण प्रवास करत होते. त्यापैकी बहुतांश सैनिक होते. कोलंबियाच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, या विमानात ११० सैनिक आणि ११ कर्मचारी होते. पुटुमायो प्रांतातील एका भागातून हे विमान दुसऱ्या ठिकाणी सैनिकांना घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली.

उड्डाणानंतर काही वेळातच विमान जमिनीवर कोसळले आणि भीषण स्फोट झाला. या अपघातात विमानात असलेल्या स्फोटक आणि दारुगोळ्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आणि बचावकार्यावर मोठा परिणाम झाला. अपघातस्थळी धुराचे प्रचंड लोट दिसत होते आणि परिसरात मोठी खळबळ उडाली होती. अपघातानंतर बचाव पथकांनी तत्काळ कारवाई करत अनेक जखमींना बाहेर काढले. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे ७७ जणांना जखमी अवस्थेत वाचवण्यात यश आले आहे. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या घटनेबाबत कोलंबियाच्या संरक्षण मंत्रालयाने आणि हवाई दलाने सखोल तपास सुरू केला आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे विमान कोसळण्यापूर्वी सुमारे दोन किलोमीटर अंतरावर होते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर सरकारच्या धोरणांवर टीका होत असून लष्करी विमानांच्या देखभालीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या भीषण अपघातामुळे कोलंबियात शोककळा पसरली आहे.