पुणे जिल्ह्यात वाजले निवडणुकीचे बिगुल !

24 Mar 2026 16:59:04
पुणे,
Elections in Pune district पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा निवडणुकांचे वातावरण रंगू लागले आहे. जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुकांनंतर आता भोर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमधील रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यात ९ थेट सरपंच पदे आणि ३४ सदस्य पदांचा समावेश आहे.निधन, राजीनामे तसेच इतर कारणांमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे या पदांसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
Elections in Pune district
 
 
जाहीर कार्यक्रमानुसार, ३० मार्च रोजी तहसीलदारांकडून अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर ७ ते १३ एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. १५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार असून १७ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत दिली आहे.प्रत्यक्ष मतदान २८ एप्रिल रोजी पार पडणार असून दुसऱ्याच दिवशी, म्हणजे २९ एप्रिलला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच भोर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध गट-तट आपापल्या उमेदवारांच्या समर्थनासाठी हालचाली करत असून गावागावांत बैठका, चर्चांना वेग आला आहे. या पोटनिवडणुकांमध्ये सर्वसमावेशक आणि मजबूत उमेदवार उभे करण्यासाठी विविध राजकीय गट प्रयत्न करत आहेत. विशेषतः ९ सरपंच पदांवर कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहणार, याकडे संपूर्ण भोर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0