13 वर्षांच्या वेदनांना पूर्णविराम... हरीश राणा यांचे एम्समध्ये निधन

24 Mar 2026 18:03:17
नवी दिल्ली
Harish Rana euthanasia case हरीश राणा यांनी मंगळवारी दिल्ली एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने याची पुष्टी केली आहे. 31 वर्षांचे हरीश 13 वर्षांपासून कोमात होते. सर्वोच्च न्यायालयाने 11 मार्च रोजी इच्छामृत्यूला परवानगी दिली होती. हा देशातील पहिलाच असा प्रकार आहे, ज्यात एखाद्याला इच्छामृत्यू देण्यात आला आहे. 14 मार्च रोजी हरीश यांना दिल्ली एम्समध्ये हलवण्यात आले होते. एम्स प्रशासनाने 16 मार्च रोजी हरीश राणा यांची फीडिंग ट्यूब काढली होती.
 

 Harish Rana euthanasia case 
एम्समध्ये हरीश यांना पॅसिव्ह यूथेनेशिया (निष्क्रिय इच्छामृत्यू) देण्यात आले. याचा अर्थ असा की, गंभीर आजारी रुग्णाला जिवंत ठेवण्यासाठी दिलेला बाह्य लाइफ सपोर्ट किंवा उपचार थांबवणे किंवा काढून टाकणे, जेणेकरून रुग्णाचा नैसर्गिकरित्या मृत्यू होऊ शकेल.


11 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता
सर्वोच्च न्यायालयाने 11 मार्च रोजी इच्छामृत्यू प्रकरणात निकाल दिला होता. न्यायालयाने 13 वर्षांपासून कोमात असलेल्या 31 वर्षीय तरुण हरीश राणा यांना इच्छामृत्यूची (पॅसिव्ह यूथेनेशिया) परवानगी दिली होती.निकालानंतर आई निर्मला देवी म्हणाल्या होत्या की, ‘मुलाच्या उपचारासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये दाखवले आणि अनेक डॉक्टरांकडून उपचारही करून घेतले, पण आशा जवळजवळ संपल्या आहेत. आता फक्त देवाला हीच प्रार्थना आहे की त्याला या वेदनेतून लवकर मुक्ती मिळावी.’
 
 
2013 चा तो अपघात…हरीश कोमात गेले
दिल्लीत जन्मलेले हरीश राणा चंदीगडच्या पंजाब विद्यापीठातून बीटेक करत होते. 2013 साली शेवटच्या सत्राच्या अभ्यासादरम्यान वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडले. अपघातानंतर त्यांच्या संपूर्ण शरीराला लकवा मारला आणि ते कोमात गेले. तेव्हापासून ते बोलू शकत नाहीत आणि कोणत्याही गोष्टीची जाणीवही त्यांना होत नव्हती.डॉक्टरांनी हरीशला क्वाड्रिप्लेजिया नावाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे सांगितले होते. या स्थितीत रुग्ण पूर्णपणे फीडिंग ट्यूब (खाण्यापिण्याची नळी) आणि व्हेंटिलेटरच्या आधारावर जिवंत राहतो.
Powered By Sangraha 9.0