अबब...झारखंडमध्ये सापडला २२७ किलोचा जिवंत बॉम्ब!

24 Mar 2026 13:27:37
पूर्व सिंहभूम,
Live bomb found in Jharkhand झारखंडमध्ये तब्बल २२७ किलो वजनाचा जिवंत बॉम्ब सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील बहारागोरा परिसरात सुवर्णरेखा नदीच्या काठावर वाळू उत्खनन सुरू असताना स्थानिकांना जमिनीत गाडलेली मोठी वस्तू आढळून आली. तपासानंतर ही वस्तू प्रत्यक्षात स्फोटक असल्याचे समोर आले.माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सुरक्षित केला. पुढील धोका टाळण्यासाठी संपूर्ण भाग सील करण्यात आला असून, लष्कराच्या मदतीने हा बॉम्ब हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
 
Live bomb found in Jharkhand
 
दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बॉम्ब
तपासात हा बॉम्ब अमेरिकेत तयार झालेला असून, त्यावर संबंधित तपशील नमूद असल्याचे समोर आले आहे. हा स्फोटक पूर्णपणे सक्रिय अवस्थेत असल्याने कोणत्याही क्षणी स्फोट होण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. बॉम्ब शोध व निष्क्रिय करणाऱ्या पथकाने तपासणी करून तो खरोखरच जिवंत असल्याची पुष्टी केली आहे. हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या काळात पूर्व भारतातील काही भागांमध्ये परकीय लष्कराचे तळ होते आणि त्या वेळी विमानांमधून मोठ्या प्रमाणात शस्त्रसामग्री आणि स्फोटके वाहून नेली जात होती. काही वेळा ही स्फोटके अपघाताने जमिनीवर पडून न फुटता तशीच गाडली गेली असावीत, असा अंदाज आहे.
सदर बॉम्बही अशाच प्रकारे जमिनीत गाडला गेला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारचे जुने स्फोटक पदार्थ अनेक दशके सुरक्षित अवस्थेत राहू शकतात आणि आजही ते धोकादायक ठरू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर पोलिस आणि लष्कराच्या पथकांनी समन्वय साधत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, बॉम्ब सुरक्षितरीत्या निष्क्रिय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे.
Powered By Sangraha 9.0