एक तारीख चुकली अन प्रामाणिकपणाचा पडला विसर...

24 Mar 2026 20:05:21
मुदती आधीच वीज कापण्याचा महावितरणचा प्रताप
 
भंडारा :
सध्या प्रत्येक मार्च महिन्याच्या अखेरीस आर्थिक वर्षाची गोळाबेरीज केली जात आहे. यात Mahavitaran महावितरण कंपनीने देखील आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. थकलेली वीज बिल भरणे हे प्रत्येक ग्राहकाचे कर्तव्यच आहे. पण कायम नियमितपणे वीज बील भरणाऱ्या एखाद्या ग्राहकाची एखादी तारीख चुकली तर थेट त्याची वीज कापून टाकण्याचा प्रकार संतापजनक आहे. 15 दिवसाची मुदत असताना 8 दिवसातच एका ग्राहकाची वीज कापून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा दाखवला मात्र ग्राहकाचा वर्षानुवर्षाचा प्रामाणिकपणा कंपनीला दिसला नाही. शैलेश पांडुरंग नागापूरे असे वीज ग्राहकाचे नाव आहे.
 
 
vij
 
Mahavitaran  विज बिल भरणे, कर भरणे हा प्रत्येकाच्या नागरी कर्तव्याचा भाग आहे. त्यामुळे त्यापासून कोणी पळ काढू शकत नाही किंवा ते टाळणे वास्तवाला धरून नाही. सामान्य नागरिक या लहान लहान गोष्टींकडे काळजीपूर्वक बघतो. नागरी कर्तव्याचे पालन करताना, मी आपल्या घरापर्यंत येऊन पैसे मागू नये याची काळजी तो नेहमीच घेत असतो. परंतु एखाद्या वेळी काही कारणास्तव बिल भरण्याची तारीख चुकली, तर जणू काही तो मोठा अपराधी असल्यागत त्याची बीज कापून टाकण्याचा प्रकार प्रामाणिक ग्राहकांना दुखावून जातो. सध्या मार्च महिन्यातील 'फायनान्शिअल क्लोजिंग'च्या नावाखाली सगळेच विभाग ग्राहकांकडे असलेली थकीत वसूल करण्याच्या मागे लागले आहेत. वितरण कंपनीही त्यात आघाडीवर आहे. हे करताना जरा माणुसकी दाखविली जावी, ही अपेक्षा असते. जे खरंच आपल्या जबाबदारी प्रती सजग नाहीत, अशांवर कारवाई केलीच पाहिजे. पण कारवाईच्या नावाखाली प्रामाणिक ग्राहकांना भेठीस धरणेही चुकीचे आहे.
 
 
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमांनुसार, वीज खंडित करण्यापूर्वी ग्राहकाला १५ दिवसांची पूर्वसूचना देणे बंधनकारक असते. अचानक येऊन वीज कापणे नियबाह्य आहे. असे असताना भंडाऱ्यातील शांतीनगर येथे राहणाऱ्या शैलेश पांडुरंग नागापुरे य ग्राहकासोबत असाच प्रकार घडला. त्यांनी फेब्रुवारी महिन्याचे १९२० रुपयांचे वीज बिल भरले नाही. म्हणून त्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता घरची वीज खंडित करण्यात आली. विशेष म्हणजे १६ मार्च ही अंतिम देय दिनांक होती, त्यामुळे नियमानुसार पुढील १५ दिवस वीज खंडित करता येत नसताना दिनांक २४ मार्च २०२६ रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कापण्यात आली. यामुळे संतापलेल्या घरमालकाने याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विचारणा केली. मार्च एंडिंगचे टारगेट असल्यामुळे कारवाई करण्यात आली, असे सांगण्यात आले. दिवसभर वीज नसल्याने घरातील ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना त्रास सहन करावा लागला.
 
 
Mahavitaran  केवळ एका महिन्याचे वीज बिल थकीत आहे, म्हणून थेट वीज जोडणी खंडित करणे ही ग्राहकांसाठी त्रासदायक आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने अन्यायकारक बाब आहे. महावितरण कंपनीच्या कार्यपद्धतीवर आणि सध्याच्या त्यांच्या 'मार्च अखेर' मोहिमेवर सर्वसामान्य जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे. अडचणींचा विचार करता, ग्राहकांना पुरेशी संधी न देता अचानक वीज तोडणीची कारवाई करणे योग्य नसल्याचे नागापूरे यांनी म्हंटले आहे.
 
 

या प्रकाराबद्दल माहिती घेऊन त्या ग्राहकाचे नाव यादीत नेमके कसे आले, मुदत संपण्यापूर्वी त्या ग्राहकाचा घरचा वीज पुरवठा खंडित का करण्यात आला, याबद्दल माहिती घेऊन त्यानंतरच याबद्दल बोलू शकतो., अशी प्रतिक्रिया महावितरणचे कार्यकारी अभियंता जयस्वाल यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0