इस्लामाबाद,
New twist in US-Iran tensions अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील कारवाई काही काळासाठी थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन्ही देशांमध्ये संवादाची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान या प्रक्रियेत मध्यस्थाची भूमिका बजावू शकतो, अशी चर्चा जोर धरत आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेचे आयोजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चर्चेत दोन्ही देशांचे वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी होऊ शकतात. तसेच इस्त्रायल, तुर्की आणि इजिप्तमधील वरिष्ठ नेतेही या प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या चर्चेत अमेरिकेच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थितीही संभव असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इराणच्या राष्ट्रपतींसोबत दूरध्वनीवरून संवाद साधत मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी इराणला इस्लामाबाद येथे चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचेही समजते. याआधीही दोन्ही नेत्यांमध्ये अनेक वेळा संवाद झाल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनीही इराणच्या नेतृत्वाशी आणि अमेरिकेच्या नेतृत्वाशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.या सगळ्या घडामोडींमुळे पाकिस्तान स्वतःला शांतता प्रस्थापित करणारा देश म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणात बोलले जात आहे.
मात्र, या चर्चांबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अमेरिकेच्या प्रशासनानेही या विषयावर सध्या काहीही अधिकृतपणे सांगण्यास नकार दिला असून, हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, इराणकडून या प्रस्तावित चर्चांबाबत नकारात्मक प्रतिक्रिया देण्यात आली आहे. इराणच्या संसदेतल्या एका प्रमुख नेत्याने या बातम्यांना अफवा असल्याचे म्हटले असून, आंतरराष्ट्रीय बाजार आणि राजकारणावर परिणाम करण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सध्या या संभाव्य चर्चेबाबत निश्चित चित्र अस्पष्ट असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.