वाशीम,
police-raid-on-gambling-den : वाशीम -अकोला रोडवरील पाटील ढाब्यावर सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर आज सकाळी वाशीम ग्रामीण पोलिस आणि उपविभागीय पोलीस पथकाने संयुक्तरीत्या छापा टाकला. या कारवाईत ५२ पत्त्यावर पैशांची हारजित लावणार्या ४ जुगारींना रंगेहात पकडण्यात आले, तर १४ जण पोलिसांची चाहुल लागताच पसार झाले. या कारवाईत जुगार साहित्यासह अवैध दारूसाठा आणि वाहने असा एकूण सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, वाशीम - अकोला मार्गावरील पाटील ढाब्यावर मोठ्या प्रमाणावर अवैध जुगार आणि दारू विक्री सुरू होती. माहिती मिळताच अग्रवाल यांनी आपल्या पथकासह आज २४ मार्च रोजी सकाळीच ढाब्यावर धाड टाकली. पोलिसांचा ताफा धडकताच जुगाराच्या टेबलवर बसलेल्याची मोठी पळापळ झाली. या छाप्यात पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, इतर १४ आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. या सर्व १८ आरोपींविरुद्ध वाशीम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.