तीन पिढ्यांची परंपरा चौथ्या वर्षीही अविरत

24 Mar 2026 19:49:04
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
ram-navami : रामनवमी म्हटली की प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाचा भक्तिमय उत्साह, मंदिरांतील मंगलमय वातावरण आणि कीर्तन भजनांची परंपरा अनुभवायला मिळते. या पावन पर्वानिमित्त यवतमाळ आणि नागपुरातील देशपांडे कुटुंबाने जपलेली एक अनोखी आणि प्रेरणादायी परंपरा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
 
 
y24March-Kirtan
 
‘कीर्तन रामनवमी’ या उपक्रमांतर्गत देशपांडे कुटुंबातील तीन पिढ्यांतील पाच जण सलग चौथ्या वर्षी, एकाच वेळी, पाच वेगवेगळ्या श्रीराम मंदिरांमध्ये जाऊन रामजन्माचे आख्यान सादर करणार आहेत. वडील सदानंद देशपांडे, आई चंदा देशपांडे, मुलगा चैतन्य देशपांडे, त्याची पत्नी नुपूर देशपांडे आणि त्यांचा चिरंजीव देवव्रत या पाच जणांचा हा उपक्रम आहे. एकाच कुटुंबातील सदस्यांनी विविध ठिकाणी रामललाच्या जन्माचे कीर्तन सादर करणे हा निश्चितच दुर्मिळ योग आहे.
 
 
तीन वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे जोपासली जात असून यंदाचे हे चौथे वर्ष आहे. नागपूरच्या प्रतापनगरातील देशपांडे कुटुंबातील हे पाच जण पाच वेगवेगळ्या श्रीराम मंदिरांत रामनवमीला गुरुवार, 26 मार्च रोजी रामजन्माचे आख्यान सादर करणार आहेत.
 
 
या उपक्रमात सदानंद देशपांडे यवतमाळला रामनगरातील श्रीराम मंदिरात, त्यांच्या पत्नी चंदा देशपांडे या यवतमाळातच संभाजीनगरातील योगिराज गजानन मंदिरात, त्यांचे सुपुत्र चैतन्य देशपांडे हे नागपुरातील दीक्षित वाडा, त्यांच्या पत्नी नुपूर या डागा लेआऊटमधील श्री हनुमान मंदिरात आणि त्यांचे चिरंजीव देवव्रत देशपांडे उज्ज्वलनगर येथील श्री हनुमान मंदिरात कीर्तन करणार आहेत.
 
 
देशपांडे कुटुंबात नारदीय कीर्तनाची पाच पिढ्यांपासून परंपरा आहे. अवघ्या 11 वर्षांच्या देवव्रत देशपांडेला नुकत्याच नागपुरात झालेल्या योगेश्वर कीर्तन महोत्सवात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या हस्ते ‘कीर्तनकुमार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, हे उल्लेखनीय.
Powered By Sangraha 9.0