RCB ला आणखी एक मोठा धक्का! हा धाकडं गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर

24 Mar 2026 14:35:15
नवी दिल्ली,
rcb-bowler-out-of-ipl-2026 : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम २८ मार्च रोजी सुरू होणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज यश दयाल संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर झाला आहे. आरसीबीचे संचालक मो बोबाट यांनी ही घोषणा केली. विशेष म्हणजे, जोश हेझलवूडच्या रूपाने आरसीबीला आधीच मोठा धक्का बसला आहे. हेझलवूड सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी आधीच संघाबाहेर झाला आहे.
 
RCB
 
 
यश दयालबाबत, आरसीबीचे संचालक मो बोबाट यांनी सांगितले की, तो या हंगामात आरसीबीसाठी उपलब्ध नसेल. त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय घेतला आहे. तथापि, आरसीबीने अद्याप त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर फ्रँचायझी यश दयालची जागा घेईल की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. यश दयालने गेल्या हंगामात आरसीबीसाठी चांगली गोलंदाजी केली होती आणि एकूण १३ बळी घेतले होते.
अलीकडे यश दयाल यांच्याबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. ते या हंगामात आरसीबी संघाच्या प्रशिक्षण शिबिरात अद्याप सामील झाले नव्हते, त्यामुळे त्यांच्या सहभागाबद्दल प्रश्न निर्माण झाले होते. तथापि, स्पर्धा सुरू होण्याच्या अवघ्या चार दिवस आधी, आरसीबीच्या संचालकांनी ते संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर असल्याची पुष्टी केली. अलीकडेच, आयपीएल २०२६ साठीच्या आरसीबी संघाच्या बसचे फोटो सोशल मीडियावर समोर आले. सर्व खेळाडूंचे चेहरे दिसत असताना, यश दयाल यांचा फोटो मात्र गायब होता.
आयपीएल २०२६ चा पहिला सामना गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाईल. हा सामना २८ मार्च रोजी आरसीबीच्या घरच्या मैदानावर, एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात आरसीबी आपले विजेतेपद टिकवण्याचा प्रयत्न करेल.
Powered By Sangraha 9.0