यवतमाळ,
येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या सहयोगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त 'Sangh Ganga Ke Tin Bhagirath' ‘संघ गंगा के तीन भगीरथ’ हे नाट्यमय सादरीकरण नागपूर व पुणे येथील ताराराणी फाऊंडेशन यांंनी प्रस्तुत केले. खरंतर संघाचा 100 वर्षांचा काळ आणि डॉक्टर हेडगेवार, गोळवळकर गुरुजी तसेच बाळासाहेब देवरसांच्या कारकिर्दीवर एखादं नाटक बेतणं हेच मुळात एक मोठं आव्हान होतं. पण लेखक श्रीधर गाडगे यांनी ते लीलया पेललं आहे. भारतमातेलाच निवेदक म्हणून पेश करणं ही संकल्पनाच त्यांच्या कल्पकतेची भरारी दर्शविते. भारतमाता झालेल्या मीनल मुंडले आपल्या व्यक्तिमत्वाची छाप, स्पष्ट उच्चारण आणि खणखणीत आवाजात अशी काही पेश करतात की आपल्याला त्यांच्या गारुडातून बाहेर पडायला उसंतच मिळत नाही.
लेखक श्रीधर गाडगे, दिग्दर्शक संजय पेंडसे आणि नेपथ्य-प्रकाश योजना कुशलतेने सांभाळणारे सतीश पेंडसे हे भगीरथी त्रिकूट, नाट्यरूपी गंगेचं रंगमंचावर असं काही अवतरण करतात की सर्व प्रेक्षक स्तिमितच होतात. सलग 2 तास 20 मिनिटे प्रेक्षागृहात सर्वांना खिळवून ठेवणे म्हणजे एक किमयाच म्हणावी लागेल. प्रेक्षकांनी ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी दुमदुमून टाकत प्रतिसाद देणे, ही या प्रयोगाच्या यशाची पावती आहे आणि हे आपले हे परिश्रम सार्थकी लागले असे निर्मात्या सारिका पेंडसे यांना वाटले असावे. भाग्यश्री चिटणीस यांचं पार्श्वसंगीत समर्पक अन तितकेच तोलामोलाचं होतं.
'Sangh Ganga Ke Tin Bhagirath' तरुण डॉ. हेडगेवार शैलेश भलमे यांनी संयमित प्रगल्भतेने सादर केले. पण नाटकाची अतिशय जमेची बाजू म्हणजे मनीष उईके यांनी साकारलेले ज्येष्ठ ते वयस्कर डॉ. हेडगेवार. ही भूमिका ते अक्षरशः जगलेत. गोळवळकर गुरुजींची भूमिका अनिल पालकर यांनी संयत पण प्रसंगी आक्रमक अशी सादर केली. देवरसांच्या भूमिकेत स्वप्नील जतकर अतिशय चपखल बसलेत. अतिशय सहजतेने त्यांनी देवरस साकारले. अतिशय सुरेख तितक्याच प्रभावी नाट्यप्रयोगाची ही गंगा, गावोगावी वाहत जावी, जिच्या घाटावर लाखोंच्या संख्येने जाणकार, रसिक नागरिकांनी न्हाऊन निघावं. संघनिर्मिती, तिची संरचना, स्वयंसेवी भूमिकेची जाण, सर्वांना व्हावी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनेचा वटवृक्ष, अजूनच फोफावत जावा अशी आशादायक दृढता, या नाट्यप्रयोगाने दिल्याची प्रेक्षकांची प्रतिक्रिया होती.