नवी दिल्ली,
Terrorist network exposed in Delhi दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत एका दहशतवादी जाळ्याचा पर्दाफाश केला असून या प्रकरणात एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पूर्व विभागातील पथकाने केली असून पाकिस्तानमधील गुन्हेगारी व दहशतवादी कारवायांशी संबंधित शहजाद भट्टीच्या नेटवर्कशी संबंधित धागेदोरे यात समोर आले आहेत. अटक करण्यात आलेल्या तरुणाची ओळख हरमनदीप सिंग उर्फ हरमन अशी झाली असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील रामपूर येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यातून परदेशातील संपर्कांशी केलेले संदेश, छायाचित्रे आणि काही व्हिडिओ आढळून आले. तसेच 'टीटीएच' असे लिहिलेले काळे स्प्रेही जप्त करण्यात आले आहे. तपासात असेही समोर आले की, आरोपीने पंजाबमधील काही ठिकाणी हे चिन्हे भिंतींवर रेखाटली होती आणि त्याचे व्हिडिओ तो परदेशातील संपर्कांना पाठवत होता. तो उत्तर प्रदेश आणि दिल्लीतही अशाच प्रकारच्या कारवाया करण्याच्या तयारीत होता, मात्र पोलिसांनी वेळेत कारवाई करत हा कट उधळून लावला.
पोलिसांच्या माहितीनुसार, या जाळ्यात तरुणांना पैशांचे आमिष तसेच परदेशात पाठवण्याचे आमिष दाखवून आकर्षित केले जात होते. समाजमाध्यमांचा वापर करून ही भरती केली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच रामपूरमधील पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याचाही कट आखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हरमनदीप सिंग सातत्याने परदेशातील हँडलर्सच्या संपर्कात होता आणि त्यांच्याकडून सूचनाही घेत होता. त्याचे काही साथीदार दिल्लीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेशी संबंधित असल्याचा दावाही त्याने केला आहे. या प्रकरणामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठा धोका टळला असून, दिल्ली पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.