तभा वृत्तसेवा
वणी,
Vivek Ghalsasi : चैत्र नवरात्र महोत्सवानिमित्त येथील जैताई देवस्थानात 22 ते 25 मार्च दरम्यान आयोजित श्रीराम चरित्र दर्शन प्रवचनमालेत प्रख्यात प्रवचनकार विवेक घळसासी यांनी सोमवार, 23 मार्च रोजी दुसरे पुष्प गुंफताना रामचरित्रातून व्यक्तिमत्त्व विकास व आध्यात्मिक उन्नतीचा संदेश दिला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, आजचा समाज प्रदूषित दुष्प्रचाराला बळी पडत असून आपल्या धर्माच्या शिकवणीचे ज्ञान आई-वडिलांकडे नसल्यामुळे पुढील पिढी या मूल्यांपासून दूर जात आहे. ज्ञानाचा जन्म भक्तीच्या पोटी होतो आणि ज्ञानामुळे भक्तीचा महिमा अधिक वृद्धिंगत होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, रामचरित्र हे मनुष्याला अज्ञान, अहंकार आणि आसक्तीतून मुक्त करणारे आहे. मनुष्याचे जीवन ध्येय ओळखण्याच्या आधारावर तीन प्रकार पडतात, असे सांगत त्यांनी मुक्ती म्हणजे अज्ञानातून बाहेर पडणे, असा अर्थ स्पष्ट केला. मनुष्याचा देह हेच ईश्वराचे सर्वात प्रिय मंदिर आहे, असेही त्यांनी नमूद केले.
रामायणातील सात कांडांच्या माध्यमातून जीवनातील सात टप्पे आणि मुक्तीचे मार्ग स्पष्ट होतात, असे सांगत त्यांनी बालकांडापासून उत्तरकांडापर्यंत सखोल विवेचन केले. बालकांडात निरागसता, अयोध्याकांडात संघर्षरहित स्थिती, अरण्यकांडात संयम व साक्षीभाव, किष्किंधाकांडात मैत्री व विश्वास, सुंदरकांडात निष्काम सेवा, तर युद्धकांड व उत्तरकांडात विकारांवर विजय मिळवून आत्मिक समाधान प्राप्त करण्याचा संदेश दिला.
रामायण म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रवास असून सीताशांती व आत्मारामाची प्राप्ती हेच त्याचे अंतिम उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या प्रवचनमालेच्या दुसèया सत्राचे सूत्रसंचालन सागर मुने यांनी केले. प्रवचनकार विवेक घळसासी यांचे स्वागत व सत्कार नामदेव पारखी यांनी केले.