अनिल कांबळे
नागपूर,
11 laborers injured in bizarre accident वाहन चालवताना चालकाच्या पायाजवळील जेवणाचा टिफिन बॉक्स ब्रेकखाली अडकल्यामुळे झालेल्या अपघातात ११ जण जखमी झाले. वर्धा मार्गावरील हॉटेल प्राईडजवळ सोमवारी रात्री हा अपघात झाला. यशोधरा नगर येथील किरण नथुजी मेश्राम (४९) हे मागील १५-२० वर्षांपासून केटरिंगचा व्यवसाय करतात. २३ मार्च रोजी वर्धा रोडवरील टाकळघाट येथे महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी ते आपल्या कामगारांसह बोलेरो पिकअप वाहनाने गेले होते. कार्यक्रम संपल्यावर रात्री ते सर्वजण नागपूरकडे परत निघाले. वाहनात १६ जण प्रवास करत होते. अर्जुन रमेश वाघोडे (२५) हा वाहन चालवत होता. परतीच्या प्रवासादरम्यान चालकाने जेवणाचा टिफिन बॉक्स गिअरजवळ ठेवला होता. मात्र त्याची योग्य काळजी न घेतल्याने हॉटेल प्राईड चौकाजवळ सिग्नलच्या आधी अचानक टिफिन बॉक्स खाली पडून ब्रेक पेडलखाली अडकला.
त्यामुळे चालकाने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला तरी ब्रेक नीट लागत नव्हता. पुढे वाहने उभी असल्याने मोठा अपघात टाळण्यासाठी चालकाने वाहन दुभाजकावरच चढवले. त्यामुळे वाहनातील प्रवासी जोरात आपटून जखमी झाले. या अपघातात पाच पुरुष, पाच महिला आणि एका लहान मुलासह ११ जण जखमी झाले. जखमींमध्ये फिर्यादी किरण मेश्राम तसेच त्यांचा सात वर्षांचा मुलगा गोपाल मेश्राम यांचाही समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मेश्राम यांच्या तक्रारीवरून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.