अनिल कांबळे,
नागपूर,
criminals-deported : रामनवमी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पाेलिस प्रशासनानाकडून शहराच्या विविध भागांतील एकूण 147 सराईत गुन्हेगारांना सणाच्या काळात शहरात राहण्यास मनाई करण्यात आली आहे. यासाठी त्यांच्यावर तात्पुरते हद्दपारीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
पाेलिस उपायुक्त राहुल मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिमंडळ 3 मधील दाेन पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतील 57 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. यात गणेशपेठ पाेलिस ठाणे हद्दीतील 40 तर तहसील ठाणे अंतर्गत 17 गुन्हेगारांचा समावेश आहे. या गुन्हेगारांना 24 ते 27 मार्च या कालावधीत नागपूर शहर आणि ग्रामीण हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. याच प्रमाणे परिमंडळ क्रमांक 5 मधील विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा पाेलिस उपायुक्त निकेतन कदम यांनी परिमंडळातील पाच पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतील 90 आराेपींविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेश जारी केले.
यामध्ये शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे तसेच अवैध दारू विक्री करणा-यांचा समावेश आहे. यात यशाेधरानगर येथील 25, कळमना 15, पारडी 20, वाठाेडा 18 तर भांडेवाडी पाेलिस ठाणे हद्दीतील 12 आराेपींचा समावेश आहे. या आराेपींना 25 ते 27 मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत संबंधित कार्यक्षेत्रात प्रवेश न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही सर्व कारवाई पाेलिस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल, सह पाेलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
रामनवमी सण शांततापूर्ण आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी पाेलिस प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांनी काेणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि परिसरात संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ नजीकच्या पाेलिस ठाण्याला माहिती द्यावी.
- नवीनचंद्र रेड्डी, पाेलिस सहआयुक्त