दक्षिण २४ परगणा,
84 bombs found in West Bengal पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची चाहूल लागलेली असताना दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातून मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. निवडणूक सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान पोलिसांना तब्बल ८४ कच्चे बॉम्ब सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या मोहिमेदरम्यान एका तलावातून एक रायफलही जप्त करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत पार पडणार असून मतदान २३ आणि २९ एप्रिल रोजी होणार आहे. तर मतमोजणी ४ मे रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी टप्प्यांची संख्या कमी करण्यात आली आहे, कारण पूर्वीच्या निवडणुका अधिक टप्प्यांमध्ये घेतल्या जात होत्या. यंदाच्या निवडणुकीत मतदार संख्येतही बदल दिसून आला आहे. मतदार यादीच्या छाननीनंतर अनेक नावे वगळण्यात आली असून मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे अद्याप तपासणीखाली आहेत. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.