अंबाझरी भार प्रेषण केंद्रात 60 कि.वॅ. सौर प्रकल्प

25 Mar 2026 21:32:11
नागपूर, 
ambazari-load-transmitting-station : राज्य भार प्रेषण केंद्रात 60 किलोवॅट क्षमतेच्या अत्याधुनिक रूफटॉप सोलर यंत्रणेचे दिमाखदार सोहळ्यात उद््घाटन करण्यात आले. या प्रकल्पामुळे भार प्रेषण केंद्राच्या वीज वापरामध्ये अक्षय ऊर्जेचा वाटा वाढणार असून, कार्बन उत्सर्जनात मोठी घट होण्यास मदत होणार आहे.
 
 
solar
 
 
 
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राचे कार्यकारी संचालक शशांक जेवळीकर होते. महापारेषण नागपूर परिमंडळ मुख्य अभियंता सतीश अणे, महावितरण नागपूर परिमंडळ मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते या सौर प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. महाऊर्जा नागपूरचे विभागीय महाव्यवस्थापक सारंग महाजन व राज्य भार प्रेषण केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश पंतोजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
शशांक जेवळीकर म्हणाले की, वाढती ऊर्जेची मागणी व पर्यावरणीय आव्हाने लक्षात घेता अक्षय ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे ही काळाची गरज आहे. ऊर्जा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विविध तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करणे व आधुनिक प्रणालींचा अवलंब करणे आवश्यक आहे.
 
 
दिलीप दोडके म्हणालेे की, सौर ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन व पारेषण करण्यासाठी राज्यातील वीज वितरण प्रणाली अधिक सक्षम व लवचिक करणे गरजेचे आहे. महावितरण या बदलांसाठी पूर्णपणे सज्ज असून, ग्राहकांना अखंडित व स्वच्छ ऊर्जा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सतीश अणे यांनी प्रकल्पाचे कौतुक करताना सांगितले की, अंबाझरी केंद्राचा हा पुढाकार हरित ऊर्जेच्या जागतिक मोहिमेला बळ देणारा ठरेल.
 
 
सारंग महाजन यांनी राज्य सौर ऊर्जा धोरणावर प्रकाश टाकला. राज्याची सौर ऊर्जेची निर्धारित उद्दिष्ट्ये वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून, उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा वापर करून ऊर्जा स्वावलंबित्व मिळवण्यावर भर दिला जात असल्याचे स्पष्ट केले.
 
 
या प्रकल्पासाठी अंबाझरी भार प्रेषण केंद्राच्या अधीक्षक अभियंता वैशाली पाझारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता निरंजन दलाल, किशोर जोधे, अक्षय बागडे यांनी विशेष परिश्रम घेतले. विभागातील सर्व वरिष्ठ अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0