अमरावती,
anil-bonde-draupadi-murmu-discussion : महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री तथा राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्र, नवी दिल्ली येथे विशेष निमंत्रण दिले. या भेटीत डॉ. बोंडे यांनी अमरावतीसह संपूर्ण विदर्भाची वैविध्यपूर्ण ओळख आणि कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती राष्ट्रपतींसमोर मांडली.

डॉ. बोंडे यांनी राष्ट्रपतींना सांगितले की, विदर्भ ही केवळ शेतीची भूमी नाही, तर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक संपन्नतेने नटलेली भूमी आहे. कौंडिण्यपूर ही विदर्भाची प्राचीन राजधानी असून श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी याच भूमीची कन्या असल्याचा पुराणात उल्लेख आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प, चिखलदर्याची कॉफी शेती, अंबादेवी मंदिराची आध्यात्मिक परंपरा, कोरकू-गोंड-कोलाम जमातींची वैशिष्ट्यपूर्ण लोककला आणि वर्हाडी बोलीची गोडी हे सारे विदर्भाचे अनोखे वैभव डॉ. अनिल बोंडे यांनी प्रभावीपणे मांडले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदिवासी संस्कृती आणि मेळघाटातील जैवविविधतेबद्दल विशेष रस दाखवला. शिवाय, खराटा - खंजिरी - खडूच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नेतृत्व या भूमीन केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांनी मोठं कार्य उभ करत लोकजागृतीचे काम केलं, ही बाबही डॉ.बोंडे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या लक्षात आणून दिली.
कृषिमंत्री म्हणून विदर्भातील शेतकर्यांसाठी काम केलेल्या डॉ. अनिल बोंडे यांनी कृषी क्षेत्रातील एआय क्रांतीचे चित्रही राष्ट्रपतींसमोर उलगडले. किसान ई-मित्र या एआय-आधारित व्हॉइस चॅटबॉटने ११ प्रादेशिक भाषांमध्ये आतापर्यंत ९३ लाखांहून अधिक शेतकर्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. ड्रोनद्वारे पिकांचे हवाई सर्वेक्षण, उपग्रह डेटावर आधारित पूर्वसूचना प्रणाली आणि ’भारत-विस्तार’ या बहुभाषिक एआय साधनामुळे विदर्भातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे ५०० कोटींचे एआय कृषी धोरण देशासाठी आदर्श मॉडेल ठरत असल्याचेही त्यांनी अभिमानाने नमूद केले. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध ऐतिहासिक विकासात्मक प्रकल्पांची माहिती देखील डॉ.अनिल बोंडे यांनी राष्ट्रपतींना दिली.